गोकुळच्या सभेत याही वर्षी गोंधळ, मुश्रीफ-पाटील एकत्र, महाडिकांना डावललेच
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची 63 वी सर्वसाधारण सभा याही वर्षी अखेर गोंधळातच पार पडली. महायुतीचे म्हणून चेअरमन पदावर असलेल्या नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत भाजपच्या संचालिका शौमिका महाडिक यांना विरोधक म्हणूनच वागणूक देऊन विषय पत्रिकेच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यास मज्जाव केला. याबरोबरच महायुतीचे मंत्री असलेले ना. हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सतेज पाटील हे दोघेही एकत्रच सभास्थळी आले शेजारी शेजारी बसले आणि गोकुळ मध्ये आपण एकत्रच आहोत हे दाखवून दिले.
सभेचे अध्यक्ष म्हणून बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ यांनी गोकुळ मार्फत आईस्क्रीम आणि चीज उत्पादन करून बाजारात आणण्याची घोषणा केली. चार संचालक वाढीसह नऊ ठराव ही मांडून मंजूर करून घेतले.
गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहती मधील गोकुळच्या खत कारखान्याच्या आवारात पार पडली. या पंचवार्षिक कारकीर्दीतील ही शेवटची सभा होती तसेच गेली चार वर्षे आ. सतेज पाटील, ना. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता होती. विरोधी संचालक म्हणून शौमिका महाडिक या व्यासपीठावर न जाता समोर सभासदांमध्ये बसून गोकुळच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करीत होत्या. काही महिन्यापूर्वी गोकुळच्या चेअरमनपदी महायुतीचे संचालक म्हणून नविद मुश्रीफ यांची निवड झाली. यामुळे भाजपच्या असलेल्या विरोधी संचालक शौमिका महाडिक यांना यावर्षी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती. पण त्यांना आजच्या सभेत सत्तारूढ चेअरमन आणि संचालकांनी प्रश्न उपस्थित करू दिले नाहीत. चेअरमन नविद मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केले. ठराव मांडले. तसेच नवी मुंबई शाखेसाठी वाशीत मदर डेअरीची जागा खरेदी करण्यासह गोकुळच्या विस्तार योजनांची माहिती देताना ” गोकुळ सीएनजी पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार असून वासरू संगोपन केंद्रातून ५०० वासरे तयार करण्यात येणार आहेत.” याशिवाय “गोकुळ सिताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी यांसारखी नवी उत्पादने बाजारात आणणार आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली. गोकुळ मार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी, सुविधा, सवलती, अनुदान, भविष्यातील योजना याबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 हजार रु. अनुदान जाहीर केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडून जिल्ह्यातील इतर बँकानीही असेच अनुदान द्यावे असे आवाहन केले. यानंतर विषय पत्रिकेचे वाचन करताना शौमिका महाडिक या प्रश्न उपस्थित करीत असताना त्यांना दिलेल्या माईकचा आवाज बंद करण्यात आला आणि सभेत मंजूर मंजूर च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबत शौमिका महाडिक यांनी आक्षेप घेतला. गेल्या वर्षीचा कारभार, चार संचालक वाढीचा ठराव याला विरोध यासह काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत अशी त्यांनी मागणी केली पण सभा संपल्याचे जाहीर झाल्याने त्यांनी माध्यमातून याबाबत नाराजी व्यक्त केली त्यांच्या समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. सभेला गोकुळ दूध संघांचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी, संस्था सभासद उपास्थित होते. सभास्थानी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
