माने-मंडलिकांसाठी मुख्यमंत्री शिंदेंसह महायुतीचे नेते, कार्यकर्ते कोल्हापूरच्या रस्त्यावर
                कोल्हापूर : कोल्हापुर आणि हातकणंगलेतून महायुतीच्यावतीने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे मंत्री, राज्य पातळीवरील, जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते आज कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरले. भव्य शक्ती प्रदर्शन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट लावलेल्या भगव्या रथातून दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीने जाऊन मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
कोल्हापूर मतदार संघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. महायुतीतील घटक पक्षाच्या काही नेत्यांची नाराजी आणि त्यातून होणारी बंडखोरी रोखण्यासह सर्वच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसात दोन वेळा कोल्हापुरात आले. बंडखोरीवर ठाम असलेल्या प्रकाश आवाडे यांची त्यांनी इचलकरंजी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मनधरनी केली आणि त्यामध्ये यशस्वी होऊन त्यांनी प्रकाश आवाडे यांना धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत सहभागी करून घेतले. शक्तीप्रदर्शनाने दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या भव्य सभेसमोर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील महायुतीच्या सरकारकडून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे आणि वेगवान निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जे निर्णय घेतले आहेत ते लोक हिताचे असल्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे गरजेचे आहे. म्हणूनच ‘मंडलिक, माने यांना मत म्हणजेच मोदींना मत’ हे लक्षात ठेवावे. कोल्हापूरची पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करणार. तसेच कोल्हापूर जिल्ह्याला महापुरापासून वाचवण्यासाठी साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार संजय मंडलिक आणि आपला विजय अडीच लाखांच्या मताधिक्याने होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ,  मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शंभूराजे देसाई, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी मंत्री रामदास कदम, सदाभाऊ खोत, माजी आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, शिवतारे बापू, समरजीत घाटगे, महेश जाधव, राहुल देसाई, आदींसह जिल्ह्यातील महायुतीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
