नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्राकडून रद्द : कुस्तीगीरांच्या आक्रोशाची दखल
नवी दिल्ली-आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीच्या माध्यमातून देशाला बहुमान मिळवून देणारे साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांचे उद्वेग आणि त्याग दर्शवणारे आंदोलन आणि देशातील तमाम कुस्तीगीरांचा आक्रोश अखेर केंद्र सरकारच्या कानावर आदळलाच. नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या महिला खेळाडूंवरील अत्याचाराच्या आरोपा नंतरही कुस्ती महासंघात बळजबरीने आणलेल्या राजकारणाच्या वादावर सरकारकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष आणि बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना देखील पदावरुन हटवण्यात आलं आहे.
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे नाराज झालेल्या कुस्तीगीर साक्षी मलिक हिने खेळातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तर कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले होते. वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्याचं सांगण्यात येतंय. नव्याने नियुक्त कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आलीये.
जवळपास वर्षभराने कुस्ती महासंघाची निवडणूक झाली होती. त्यात बृजभूषण सिंह यांच्या दबदबा पाहायला मिळाला. महत्त्वाच्या पदावर त्यांच्याच माणसांची नियुक्ती झाली होती. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी करत क्रिडापटूंकडून काही महिन्यांपूर्वी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते.
सरकारकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर कुस्तीगीरांनी आंदोलन मागे घेतले होते. पण, निवडणुकीत पुन्हा बृजभूषण यांनाच संधी मिळाल्याने काही कुस्तीगीर नाराज झाले होते. यातूनच दोन कुस्तीगीरांकडून टोकाचं पाऊल उचलण्यात आलं होतं. त्यांना इतर खेळाडूंकडून पाठिंबा वाढत चालला होता. याची दखल केंद्र सरकारने अखेर घेतली आहे.
