काँग्रेस स्थापना दिनी नागपूरात काँग्रेसची भव्य रॅली
नागपूर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी, पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटी सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. दरम्यान या रॅलीसाठी कोल्हापुरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिली.
नागपूरच्या हॅाटेल ली मेरिडीयन येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री खा. मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, आदी नेते उपस्थित होते.
