‘बिद्री’ चा उसाला राज्यात सर्वाधिक ३४०७ रु.दर जाहीर
कोल्हापूर : बिद्री ता.भुदरगड येथील दूधगंगा वेदगंगा सह. साखर कारखान्याने उसाला राज्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम ठेवताना २०२३-२४च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना टनाला ३४०७ रुपये देण्याचा निर्णय जाहीर करून नूतन संचालक मंडळाने ऊस उत्पादकांना सुखद धक्का दिला आहे.
बिद्री सहकारी साखर कारखान्याची सन २०२३ ते २८ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. पुन्हा एकदा के.पी. पाटील गटाने आपली सत्ता अबाधित ठेवत वर्चस्व निर्माण केले.
कारखान्यामध्ये नुतन संचालकांचा प्रवेश आणि अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी नूतन संचालकाची बैठक घेण्यात आली. के. पी. पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यांनी जिल्ह्यात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवत कारखान्याकडून ऊस उत्पादकांना टनाला ३४०७ रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया करण्यात आली.
बिद्री’ साखर कारखान्याने मागील हंगामात १२.६२ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ३२०९ रुपये दर दिला होता. मागील हंगामात ८ लाख ८० हजार टनाचे गाळप पूर्ण झाले होते.
यावर्षी ‘स्वाभिमानी’च्या ऊस दर आंदोलना दरम्यान कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांना दर जाहीर करता आला नव्हता. परंतु के पी पाटील यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना उच्चांकी दर देण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे ३४०७ रु जाहीर केलेला दर हा राज्यात सर्वाधिक ठरला आहे.
