November 1, 2025

मविआमध्ये हातकणंगलेतील उमेदवारीसाठी आवळे-मिणचेकर यांच्यात रस्सीखेच

0
IMG_20241015_205729

कोल्हापूर (विजय पोवार) : विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी गेले काही दिवस महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आजी-माजी आमदारांची हातकणंगले मतदारसंघात उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान आमदार म्हणून काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांनी याठिकाणी आपलाच अग्रहक्क असल्याचे सांगून प्रचारास सुरुवात केली आहे. तर निवडून येण्याची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी केलेले काम, यापूर्वी याच मतदारसंघात आमदार म्हणून केलेले काम या जोरावर शिवसेना ठाकरे गटांने हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे घ्यावा आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीबाबत ‘मातोश्री’वरील सर्व नेते सकारात्मक असल्याने डॉक्टर मिणचेकर यांनी लढतीची पूर्ण तयारी केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर सुजित मिणचेकर यांचेही नाव पुढे आले होते. पण प्रत्यक्ष तिकीट मिळू शकले नाही. तरीही डॉ.मिणचेकर यांनी पक्षनिष्ठा आणि अथक प्रयत्न करून सत्यजित पाटील (आबा) यांचा प्रचार केला. आता विधानसभेला आघाडीतील धोरणाप्रमाणे काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे हे दावेदार आहेत पण महाविकास आघाडीला निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवार बदलण्याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणूनच डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबईला ‘मातोश्री’वरील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. यातून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत, नेते अनिल देसाई, संपर्क मंत्री भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांनी डॉ. सुजित मिणचेकर यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याबाबत आणि डॉ. सुजित मिणचेकर यांनाच उमेदवारी देण्याबाबत आपण आग्रही राहू अशी भूमिका या सर्व नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे डॉ. सुजित मिणचेकर यांनी लढतीची तयारी करून मतदार संघात ही संपर्क दौरे सुरू केले आहेत. तसेच प्रचाराची यंत्रणा ही कार्यरत केली आहे. त्यांना जिल्हाप्रमुख संजय चौगुले तसेच जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण यादव, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण हे मोलाचे सहकार्य करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page