हातकणंगलेसाठी महाविकास आघाडी देणार राजू शेट्टींना पर्यायी उमेदवार : डॉ. मिणचेकरांचे नाव आघाडीवर
Vijay Powar March 13, 2024 0
कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडी सोबत येण्यासचा निर्णय घेण्यास दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेचा उमेदवार देण्याची भूमिका निश्चित केली आहे. याबाबत एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी झाली. यामध्ये एक अश्वासक चेहरा म्हणून शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावावर गांभीर्याने चर्चा झाली.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप कोणत्याच नावाची चर्चा नाही. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर असलेल्या मतदारसंघातील नाराजी मुळे भाजपसह महायुतीचे नेते पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर महाविकास आघाडीला पोषक वातावरण असूनही त्यांच्याकडेही लोकसभेसाठी उमेदवार निवडताना खरा कस लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या विरोधात लढणार ही त्यांनी जाहीर केले आहे. पण महाविकास आघाडी सोबत जाण्याबाबत निर्णय घेण्यास ते दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत येण्यास राजू शेट्टी निर्णय घेत नसतील तर महाविकास आघाडीचा उमेदवार द्यावाच लागेल अशी ठाम भूमिका आता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. यासाठी कालपासून हालचाली गतिमान केल्या आहेत.
आजच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे आ. सतेज पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, संजय चौगुले, विजय देवणे यांच्यासह माजी आ. उल्हास पाटील, सत्यजित पाटील सरूडकर, गणपतराव पाटील, आदि प्रमुख नेत्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महाविकास आघाडीकडून सातत्याने राजू शेट्टींसाठी हात पुढे करून ही त्यांच्याकडून ठोस प्रतिसाद मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्वस्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता राजू शेट्टींना पर्याय तरीही हातकणंगलेत मतदारसंघासाठी सहाही विधानसभा मतदारसंघात चालेल असा आश्वासक चेहरा पुढे आणण्यासाठी हालचाली गतिमान केल्या. महाविकास आघाडीतून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आ. सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. यामध्ये डॉ. मिणचेकर यांचे नाव अग्रेसर राहिले.
इंडिया आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार हातकणंगले लोकसभेसाठी दिला जाईल त्या उमेदवाराच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच इतर घटक पक्ष एकमताने उभे राहून त्या उमेद्वाराला निवडणुन आणण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.
बैठकीस उपस्थित राहू न शकलेले काँग्रेसचे आ. राजू आवळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी. आ.राजीव आवळे तसेच मदन कारंडे आदींनी या बैठकीत जे काही ठरेल त्याला पाठिंबा दर्शवीला. या बैठकीतून जयंत पाटील यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशअध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब, मा. गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, शिवसेना पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख मा. संजय पवार साहेब, मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर साहेब, मा.आम. सत्यजित पाटील-सरूडकर आबा, मा. आम. उल्हास पाटील दादा, शिवसेना संघटक चंगेजखान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील साहेब, मा. गणपतराव पाटील साहेब,
जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हाप्रमुख वैभवराव उगळे, मा. अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, मा.जिल्हा परिषद सदस्य महेशभाऊ चव्हाण, रोहित पाटील, नितीन बागे इत्यादी प्रमुख नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 4,436
