November 1, 2025

अजित पवारांनाच मिळाले राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह

0
bb5c3391ae7ac95e38ff88f904d1f64a1681800737146555_original

     मुंबई : शरद पवार यांनी १९९९ साली स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांनी गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये पक्षातील बहुतेक खासदार, आमदार घेऊन आपल्या ताब्यात घेतला. यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता. गेली सहा महिने यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. या सुनावण्यांसाठी स्वत: शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहायचे तर अजित पवार यांच्या गटाच्या वतीने सुनील तटकरे आणि इतरही महत्त्वाचे नेते सुनावण्यांसाठी हजर असायचे. अखेर सहा महिन्यांच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
गेल्या सहा महिन्यांत पार झालेल्या १० हून अधिक सुनावणींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं आहे. अगदी शिवसेना पक्षात फूट पडून अभूतपूर्व परिस्थितीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण बहाल केला होता. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह सोपवल्याने निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय आपण नम्रपणे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तर निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे. शरद पवार यांच्या कन्या, खा. सुप्रिया सुळे यांनी आपण या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
शरद पवार गटाला ३ पर्यायी चिन्हे पाठवण्यासाठी ७ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतोय. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे.
बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्रातले ४१ आमदार आणि नागालँडमधील ७ आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे. तसेच लोकसभेतील २ खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील ५ आमदारांनी दोन्ही गटाकडून शपथपत्रे दिलेली आहेत. हेच सारं लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा आता शेवटचा पर्याय उरला आहे. याशिवाय पुढील निवडणुका लढवण्यासाठी नवे नाव, नवे चिन्ह घेऊन मैदानात उतरावे लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page