November 2, 2025

आजरा कारखान्यावर ना. मुश्रीफ यांच्या रवळनाथ आघाडीची सत्ता

0
IMG-20231219-WA0392

कोल्हापूर : आर्थिक अडचणीत असतानाही प्रचंड चुरशीने झालेल्या आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवळनाथ विकास आघाडीने 20 पैकी १९ जागांवर 1 हजारच्यावर मतांच्या फरकाने विजय मिळवत सत्ता मिळवली.

रवळनाथ विकास आघाडीने माजी मंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांच्या चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचा दारुण पराभव केला. या आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.

     या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे आदींनी प्रयत्न केले होते. एका बाजूला यासाठी चर्चा सुरु असताना दुसरीकडे कट-शहकटाचे राजकारण ही रंगले.राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अखेरच्या क्षणी ना. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली रवळनाथ आघाडी झाली आणि या आघाडीची चाळोबा देव आघाडीशी चुरशीची लढत झाली. रविवारी मतदान झाले. आज मतमोजणी होऊन रवळनाथ आघाडीने सुमारे हजार मतांच्या फरकाने १९ जागांसह सत्ता मिळवली. निकालानंतर उमेदवार, कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुनील शिंत्रे, अण्णाभाऊ संस्थाप्रमुख अशोक चराटी, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, अभिषेक शिंपी यांच्यासह विद्यमान नऊ संचालक पराभूत झाले. प्रचंड आर्थिक अडचणीत असलेला हा कारखाना चालवायचा कसा हा प्रश्न आहे. पण निकालाने आता त्यांनाच या आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कारखान्याची सत्तासूत्रे चालवावी लागणार आहेत. आणि हे आव्हान ना. मुश्रीफ यांनी स्वीकारले आहे.
आजरा सहकारी साखर कारखाना हे स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शेतकऱ्यांच्या श्रमाचे पवित्र मंदिर आहे. सभासद शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला चांगला न्याय देण्यासाठी अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीतून त्यांनी हा कारखाना उभारला होता. त्यांच्या आणि सभासद शेतकऱ्यांच्या या भावनेचे पावित्र्य सदैव जपू. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांनी मतपेटीच्या माध्यमातून श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीवर प्रचंड विश्वास व्यक्त केलेला आहे. हा कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्याची शक्ती आणि हिम्मत श्री. रवळनाथ देवाने द्यावी अशी प्रतिक्रिया ना हसन मुश्रीफ यांनी निकालानंतर दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page