November 2, 2025

उंबरखिंडीत उभारणार शिवरायांचा जगातील पहिला धनुर्धारी रूपातील पुतळा…

0
IMG-20240203-WA0320

राज्य सरकारचा निर्णय : शिवसेना उद्योग सेलच्या उदय सावंत यांची संकल्पना


रायगड (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांच्या मूठभर सैन्याने मुघलांच्या २०,००० फौजेचा गनिमीकाव्याने दारुण पराभव केला. हा संग्राम २ फेब्रुवारी १६६१ रोजी सध्याच्या रायगड जिल्ह्यातील खोपोलीनजीकच्या उंबरखिंडीमध्ये घडला होता. शिवरायांनी या संग्रामात धनुर्धारी योद्ध्याच्या रूपात नेतृत्व केले होते. हा प्रेरक इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी उंबरखिंडीमध्ये शिवरायांचा जगातील पहिला धनुर्धारी रूपातील पुतळा आणि विजयस्तंभ उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही दिल्याची माहिती शिवसेना उद्योग सेलचे समन्वयक उदय सावंत यांनी दिली.

 

सावंत यांनी सांगितले की, डोंगराळ मुलुखाच्या सहाय्याने शत्रूला नामोहरम करण्याच्या शिवरायांच्या रणनीतीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे उंबरखिंडीची लढाई. शाहिस्तेखानाने कारतलबखानाला महाराजांच्या ताब्यातील उत्तर कोकण काबीज करण्यासाठी पाठविले. खानाने बोरघाटाच्या अलीकडील कुरवंडे घाटातून उंबरे गावात उतरायचे ठरवले. हेरांनी याची माहिती शिवाजीराजांना दिली. त्यांच्या हुकुमानुसार नेताजी पालकर आणि मावळ्यांनी पाणवठे, विहिरी ताब्यात घेतल्या. शत्रूस पाणीही मिळू नये, हा त्यामागील हेतू. याच घाटात अरुंद, अवघड, खोल घळई आहे, जिला ‘उंबरखिंड’ म्हणतात. या खिंडीतून जाणाऱ्या मुघल फौजेवर मावळ्यांनी तुफानी हल्ला चढवला. शिवाजी महाराजांनी धनुर्धारी रुपात याचे नेतृत्व केले. तहानलेल्या सैन्याची प्रचंड लांडगेतोड पाहून अखेर खानाने महाराजांपुढे शरणागती पत्करली. अफाट साधनसंपत्ती, शस्त्रे ताब्यात घेऊन महाराजांनी खान व उर्वरित सैन्याला केवळ नेसत्या वस्त्रानिशी जाऊ दिले. ही लढाई म्हणजे महाराजांच्या अद्भुत युद्धकौशल्याचे द्योतकच म्हणावे लागेल.

 

जिथे हा संग्राम घडला त्या  चावणी गावानजीक स्मारक उभारण्यात आले असून तेथे पुण्यातील शिवदुर्ग संघटनेचे कार्यकर्ते दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी ‘विजयदिन’ साजरा करतात. हा प्रेरक इतिहास मोठ्या प्रमाणात जगापुढे यावा, छ. शिवरायांचा धनुर्धारी रुपातील पुतळा उभारण्यात यावा, ही संकल्पना मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना तत्काळ उचलून धरत उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना त्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. यंदाच्या ३६३ व्या विजयदिनाच्या पूर्वसंध्येला  मंत्री उदय सामंत, खोपोलीचे आमदार महेंद्र थोरवे, रायगडचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, ‘चावणी’चे सरपंच आणि शिवभक्तांसह मीही उपस्थित होतो.

 

आपले सरकार छ. शिवाजी महाराजांच्या विचाराने कारभार करीत आहे. शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्यदैवत आहे. त्यामुळे सध्या इथे असलेल्या स्मारक परिसरात शिवरायांचा हाती ‘धनुष्यबाण’ घेतलेला पुतळा उभारण्यात येईल, जो त्यांचा जगातील असा एकमेव पुतळा असेल. विजयस्तंभही उभारण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्मारकाचे लवकरच भूमिपूजन होईल. मुख्यमंत्र्यांनी यासाठी भरघोस निधी, आवश्यक त्या परवानग्या देऊन २ फेब्रुवारी २०२५ पूर्वी हे काम पूर्ण करू, अशी ग्वाही दिली असल्याचे या वेळी पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page