महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
नवी दिल्ली : वर्ष 2023 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बुधवारी रात्री जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नऊ जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.
दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्रचे बॅडमिंटन पट्टू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मलखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, तर ‘अर्जुन पुरस्कार’ हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.
