इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली : उस उत्पादक, कारखानदारांना दिलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) -: उस उत्पादक आणि कारखानदारांच्या विरोधापुढे केंद्र सरकारने अखेर नमते घेतले आहे. उसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. या निर्णयामुळं १७ लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे. हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरला आहे.
सध्या देशात उसाचे उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात होते.
मात्र या निर्णयाचा याचा मोठा फटका कारखानदारांना बसणार होता. तसेच शेतकऱ्यांच्या उसाच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता होती. इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी अब्जावधी रुपये गुंतवले आहेत, त्याचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळेच उस उत्पादक शेतकरी यांनी कारखानदारांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यामुळेच केंद्र सरकारनं एक पाऊल मागे घेत पुन्हा उस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.
