कोल्हापूर/प्रतिनिधी :जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर या 22 वर्षे कार्यरत असलेल्या वैद्यकीय व्यवसायिकांच्या संस्थेमार्फत रविवार २१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी चार ते दहा या वेळेत जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची १२ वी ‘GPCON 24’ चे आयोजन हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर येथे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ.राजेश सातपुते, जी पी काँन अध्यक्ष डॉ.राजेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.याचबरोबर या परिषदेत डॉ.दिलीप शिंदे आणि डॉ.पी.पी. शहा यांना जी पी ए ‘जीवनगौरव पुरस्कार’ दिला जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून या संस्थेत . अँलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेद वैद्यकीय व्यावसायातील साधारणपणे ५०० डॉक्टर्स या संस्थेचे सभासद आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच निरंतर वैद्यकीय शिक्षण, समाज उपयोगी कार्य, बचावकार्य, आपत्कालीन कार्य, कोविड सारख्या महामारीच्या काळात वैद्यकीय शिबिरे, ज्योतिबा यात्रा वैद्यकीय शिबिर, पूरग्रस्त लोकांसाठी शिबिरे अशा विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, सरकारी आरोग्य योजना यामध्ये सहभाग, नागरिकांचे आरोग्याविषयी प्रबोधन, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग असा एकंदरीत सर्वच क्षेत्रात जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत असते. गेली चार वर्षे कोविडमुळे असोसिएशनची परिषद घेता आली नाही. त्यामुळे यावर्षी रविवार २१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी चार ते दहा या वेळेत जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची १२ वी GPCON 24 चे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर येथे ही परिषद होत आहे.
या परिषदेचा कोल्हापूर परिसरातील तसेच कर्नाटकातूनही वैद्यकीय व्यावसायिक लाभ घेणार आहेत. साधारणपणे ५०० वैद्यकीय व्यावसायिक या परिषदेला उपस्थित असणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, तसेच राजश्री छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व विन्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. संतोष प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. या परिषदेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्सना वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी आपत्कालीन स्थिती निर्माण होते अशावेळी विविध विषयाशी निगडित आपत्कालीन स्थिती कशी सांभाळायची याचे आधुनिक ज्ञान हे व्याख्यात्यांच्या मार्फत दिले जाणार आहे. या परिषदेचे मुख्य प्रायोजक विंन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. सुरुवातीला डॉ. सुजाता प्रभू या मेंदुतील इजा व फॅक्चर्स याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान याची ओळख करून देणार आहेत. जनरल प्रॅक्टिशनरच्या दृष्टिकोनातून सामान्य हृदयविकाराच्या इमर्जन्सी कशा हाताळायच्या याबद्दल प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. आलोक शिंदे याबद्दल मार्गदर्शन करतील. डॉ मंजुळा पिशवीकर या स्त्री व प्रसुती शास्त्रातील इमर्जन्सी याबद्दलच्या माहिती देणार आहेत. त्वचा विकारासंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान डॉ. निहारिका प्रभू नायक तर डॉ. देयोना प्रभू या प्लास्टिक सर्जरी तंत्रज्ञानाबद्दल तर डॉ. आकाश प्रभू हे पॉलीट्रामा मॅनेजमेंट याबद्दल माहिती सांगणार आहेत तर न्यूरो सर्जरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान याबद्दल डॉ. संतोष प्रभू मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूर शहरामध्ये नव्याने अत्याधुनिक विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार होत असून त्याबद्दलची माहिती डॉ. व्यंकट होलसंबरे हे देणार आहेत. त्याचबरोबर पॅनल डिस्कशन व प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमही होणार आहे. औषधी कंपन्या व विविध विषयाशी निगडित अशा स्टॉलचे प्रदर्शनही याठिकाणी ठेवण्यात आले आहे.
यावेळी डॉ.दिपक पोवार,डॉ. हरिश नांगरे,डॉ.वर्षा पाटील जाधव,डॉ. महादेव जोगदंडे आदी उपस्थित होते.