November 1, 2025

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या २५ बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

0
IMG-20231229-WA0244
   कोल्हापूर : कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल २५ रुग्णांच्या  मेंदूच्या अत्यंत जटील व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या ८ ते १० रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
    सिद्धगिरी हॉस्पिटलमधे डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमने या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.गोरगरीब लोकांना या हॉस्पिलच्या माध्यमातून  त्यांची सर्व टीम व कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत तरी गरजू रुग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अदृश्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी यावेळी केले आहे.
डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले अशा आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा
   हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया होऊ शकतात मात्र मेंदूच्या शस्त्रक्रिया होणे खूपच अवघड आहे. मेंदूच्या अनेक विकारामध्ये बायपास शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील तब्बल ८-१० ठिकाणीच होते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे बायपास शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल २५ शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलने करून दाखवली आहे
    मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो. यासाठी हृदयामार्फत प्रवाहित होणाऱ्या रक्तापैकी सुमारे २५% रक्ताचा वापर  मेंदूचे कार्य होण्यासाठी होतो. या रक्ताभिसरणासाठी कैरोटिड आर्टरी (धमनी) मोठ्या मेंदूला रक्त पुरवठा करण्याचे काम करत असते तर व्हर्तेब्रल  आर्टरी (धमनी) लहान मेंदूला रक्त पुरवठा करत असतात. त्या मेंदूमध्ये आत जावून अत्यंत जटील व अत्यंत लहान म्हणजेच केसाच्या तुलनेत दहापट लहान असतात. अनेक वेळा या रक्तवाहिन्यांच्याद्वारे रक्तपुरवठा करण्याचे बंद होते, रक्तवाहिन्या  चोकअप होतात, अशावेळी अशी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.
मेंदूच्या विकारात प्रामुख्याने मोठ्या आजारात दोन्ही रक्त वाहिन्या रक्तपुरवठा करणे बंद करतात. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांच्यात  आढळतो. अशावेळी सदर रुग्णास परत परत लकवा मारणे(स्ट्रोक बसणे) अशी लक्षणे दिसतात. अशावेळी रुग्ण कोमात जाण्याची शक्यता जास्त असते. अशी बंद झालेली रक्त वाहिनी हृदयरोगातील अन्जिओप्लास्टी सारखी ओपन करता येत नाही. यावेळी बायपास शस्त्रक्रिया हाच उपाय असतो.
  या विकारांशिवाय अनेक रुग्णांच्यात रक्त वाहिनीला फुगवटा येवून त्या खराब होतात. तसेच काही रुग्णांच्यामध्ये अँथेरोस्केरोसीस विकारामुळे रक्तवाहिन्या चोकअप होतात. याशिवाय अनेक वेळा मेंदूमध्ये वाढणारा ट्युमर रक्तवाहिन्यांच्या भोवती वाढतो व त्यांना सर्व बाजूनी व्यापून टाकतो. अशावेळी रक्तपूरवठा हि बंद होतो. अशा वेळी ट्युमरसोबत रक्तवाहिनीचा तो भाग काढणे गरजेचे असते.अशा वेळी ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी अथवा शहरात वाहतूक कोंडी होते त्यावेळी अशा कोंडीच्या ठिकाणची वाहतूक दुसरीकडे पर्यायी मार्ग काढून आपण बायपास रस्ता तयार करतो अगदी तसेच रक्तपुरवठा करण्यासाठी बायपास मार्ग मेंदूत तयार करावा लागतो. त्यामुळे या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत आधुनिक मायक्रोस्कोप (हायएंड) तसेच मशीन्स लागतात. याशिवाय त्या मशीन चालवणारे अनुभवी कर्मचारी लागतात. यावेळी रुग्णांचे रक्ताची घनता कमी झाली तरी अशा शस्त्रक्रिया अपयशी होवू शकतात, तसेच रुग्णांचा रक्तदाब हि यावेळी जास्त ठेवावा लागतो. तसेच या कालावधीत मेदूचे कार्य पार पडण्यासाठी होणारे रक्ताभिसारणास लागणारा रक्ताचा वापर कमी प्रमाणात ठेवणे व कार्बनडायऑक्साइड संतुलित ठेवणे हे आवाहनात्मक कार्य असते. अशावेळी न्युरो भूलतज्ञांची भूमिका महत्वाची भूमिका ठरत असते. या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच वरील सर्व आवश्यक बाबी व अनुभवी प्रख्यात न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, सहाय्यक न्युरोसर्जन डॉ.अविष्कार कढव आणि  कुशल कर्मचारी यांच्यामुळे ग्रामीण भागात असून हि  सिद्धगिरी हॉस्पिटलने अत्यंत कमी कालावधीत ३ ते ४ राज्यातून आलेल्या २५ रुग्णांची  यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सर्व रुग्ण आज पूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत.  धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयात इतक्या मोठ्या संख्येने मेंदूच्या बायपास शस्त्रक्रिया केली असल्याची सिद्धगिरी होस्पिटलमधील पहिलीच वेळ आहे.
   पत्रकार परिषदेस  सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, न्युरोसर्जन डॉ.आविष्कार कढव, डॉ.निषाद साठे, डॉ.स्वप्नील वळीवडे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, अभिजित चौगले, सागर गोसावी, प्रसाद नेवरेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page