टोप, कासारवाडी, शिये परिसरातील स्टोन क्रशर व्यवसायीकांचे धाबे दणाणले
कोल्हापूर : टोप, कासारवाडी, शिये परिसरात स्टोन क्रशर व्यवसायातून सुरु असलेले विनापरवाना अवैध उत्खनन, रॉयल्टीची चुकवेगिरी, महसूल खात्याचे दुर्लक्ष, याबाबत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. उत्खननाबाबत चुकीचा हिशोब दाखवून शासनाची रॉयल्टी चुकवायची आणि भरमसाठ पैसा कमवून हेलीकॉप्टर खरेदी करायचे याकडेही त्यानी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यानी या प्रश्नाला उत्तर देताना राज्यातील खाण व्यवसायातील क्रशर द्वारे होणाऱ्या उत्खननाची मागील दहा वर्षाची तपासणी करून चुकवलेल्या रॉयल्टीची वसुली करणार, त्यासाठी प्रसंगी व्यवसायीकाच्या मालमत्तेवर टाच आणणार असा स्पष्ट खुलासा केला. त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील तहसीलदार कार्यालयामार्फत कारवाई सुरुही केली. टोप कासारवाडीतील विनापरवाना ३७ स्टोन क्रशर सील केले. त्यामुळे शिये, भुये जठारवाडी, टोप, कासारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या क्रशर व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहे.
हातकणंगले ग्राममहसुल अधिकारी उमेश माळी यांच्यासह कार्यक्षेत्रातील पुलाची शिरोलीच्या मंडल अधिकारी सीमा मोरये, पेठवडगाव मंडल अधिकारी पांडुरंग धुमाळ, टोप ग्राममहसूल अधिकारी अमोल काटे, महसूल सेवक सचिन कांबळे, तलाठी व कोतवाल आदींच्या पथकाने कारवाई केली.
टोप येथील खाणीतून तहसीलदारांच्या अहवालानुसार सुमारे चार लाख ब्रास उत्खनन झाले. त्यापोटी केवळ ९६ हजार ब्रास दाखवून प्रकरण बंद करण्यात आले. त्यामुळे शासनाची सुमारे १०० कोटींची रॉयल्टी बुडाली. यातील काही व्यावसायिक हेलिकॉप्टर खरेदी करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला होता. यानंतर हातकणंगले महसूल विभाग खडबडून जागा झाला. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या आदेशाने टोप, कासारवाडी येथील खडी क्रशरची तपासणी केली.
क्रशरचा व्यापारी परवाना नसणे, पर्यावरण नियमानुसार प्रमाणपत्र नसणे या अनुषंगाने झालेल्या तपासणीमध्ये ३७ क्रशर सील करण्यात आले तर नऊ क्रशरांचे परवाने असल्याचे महसूल पथकाने सांगितले.
क्रशर व्यवसायीकांचे धाबे दणाणले
हातकणंगले महसूल विभागाने धडक कारवाई करत येथील ३७ क्रशर सील केले.महसूल विभागाने यापूर्वी १४ व १५ जानेवारीला महसूल विभागाने हीच कारवाई केली होती. सील केलेले क्रशर कोणतेही परवाने नसताना पुन्हा सुरू झाले. आ. सतेज पाटील यानी विनापरवाना, रॉयल्टीची चुकवेगिरी, संबधित खात्याचे दुर्लक्ष. हे मुद्दे उपस्थित करून. मागील काही वर्षापासूनची तपासणी, कारवाई, आणि वसूलीची मागणी केली. त्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यानी समर्पक खुलासा, आणि ठोस कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार हातकणंगले तहसीलदार कार्यालय ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. कारवाई सुरु झाली. तरीही मंत्री बावनकुळे यांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरु राहीली तर या परिसरातील ८० टक्के व्यवसाय बंद पडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे क्रशर व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान आ. सतेज पाटील यानी चुकवलेली रॉयल्टी आणि हेलीकॉप्टर खरेदी याबाबत संबधीत व्यवसायीक शिवाजी पोवार यानी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करताना ‘मी रॉयल्टी चुकवली नाही, हेलीकॉप्टरही कर्ज काढून घेतले आहे’ असे स्पष्ट केले आहे.
