महाराष्ट्र सरकारचा जर्मनीशी कुशल मनुष्यबळाचा सामंजस्य करार
मुंबई :जर्मनी देशाला मागणीप्रमाणे विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ सहकार्य करणारा सामंजस्य करार आज मुंबईत झाला. महाराष्ट्र सरकार व जर्मनीच्या शिष्टमंडळामध्ये हा करार झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री दीपक केसरकर, जर्मनचे मंत्री डॉ. फ्लाॅरेन स्टेगमन, डॉ. श्रीमती थेरेसा स्कॉपर यांच्या उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार झाला. या सामंजस्य कराराअंतर्गत वैद्यकीय शिक्षण विभागासह शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, उद्योग व कामगार, कौशल्य विकास आणि उद्योजकताच्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पहिले पाऊल म्हणून जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या औद्योगीकदृष्ट्या अतिप्रगत राज्याशी सामंजस्य करार झाला आहे.
याबाबत माहिती देताना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी जर्मनीला पाठवण्याविषयी हा सामंजस्य करार आहे. युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. राज्यात विविध कौशल्यप्राप्त वैद्यकीय कुशल मनुष्यबळ उपलब्ध असून त्यांना प्रशिक्षण आणि जर्मन भाषा शिकून निवडपात्र मनुष्यबळ जर्मनीत पाठवण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमातून निर्माण होणाऱ्या कुशल मनुष्यबळाची माहिती अशी महाराष्ट्र राज्यात एएनएमची ३५ शासकीय व ५६७ खाजगी संस्थांमधून अनुक्रमे १४०० व १४,६१५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. शासकीय व खाजगी एएनएम मधील राज्यातील नोकरीचे प्रमाण अनुक्रमे १७ टक्के व ३७ टक्के आहे. तसेच; शासकीय व खाजगी एएनएममधील राज्याबाहेरील नोकरीचे प्रमाण अनुक्रमे ३२ टक्के व ४८ टक्के आहे.
महाराष्ट्र राज्यात जीएनएमच्या ४० शासकीय व ४४९ खाजगी संस्थांमधून अनुक्रमे १५४५ व २१,१२५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. शासकीय व खाजगी जीएनएममधील राज्यातील नोकरीचे प्रमाण अनुक्रमे २४ टक्के व ४० टक्के आहे. तसेच; शासकीय व खाजगी जीएनएममधील राज्याबाहेरील नोकरीचे प्रमाण अनुक्रमे ४३ टक्के व ४५ टक्के आहे.
महाराष्ट्र राज्यात बी. एसस्सी. नर्सिंगच्या पाच शासकीय व १७८ खाजगी संस्थामधून अनुक्रमे २५० व ९,०८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. शासकीय व खाजगी बी. एसस्सी- नर्सिंगमधील राज्यातील नोकरीचे प्रमाण अनुक्रमे २२ टक्के व ३३ टक्के आहे. तसेच; शासकीय व खाजगी बी. एसस्सी.- नर्सिंगमधील राज्याबाहेरील नोकरीचे प्रमाण अनुक्रमे ३५ टक्के व ४८ टक्के आहे.
