December 27, 2025

लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
IMG-20240205-WA0278

कोल्हापूर : महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरू केलेला जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्यासह सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. याचबरोबर तातडीने अनुपालन सादर करणे, आवश्यकता पडल्यास सुनावणी घेवून प्रकरणे निकाली काढा असेही सांगितले.

जनता दरबारासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु; दोन दिवसांपूर्वीच त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले होते की, मी उपस्थित नसलो तरी जनता दरबार नियमितपणे होईल. नागरिकांनी समस्या आणि गा-हांणी घेऊन जनता दरबारात यावे व नूतन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह इतर विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे समस्या मांडाव्यात असे आवाहन केले होते.

या लोकशाही दिनाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, इचलकरंजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरीक्त आयुक्त केशव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचेसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मागील जनता दरबारातील तक्रारींचे अनुपालन पुढिल जनता दरबारापर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याचबरोबर विभागप्रमुखांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात येणे, जबाबदारींचे योग्य पध्दतीने कामकाज करणे तसेच नागरिकांच्या तक्रारी समस्या स्विकारून त्यावर अनुपालन वेळेत सादर करणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पहिल्याच जनता दरबार व लोकशाही दिनाला उपस्थित असणारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय १२४ व इतर विभाग १७३ असे एकुण २९७ अर्ज दाखल झाले. यात करवीर तहसीलदार यांचे कडील २२, जिल्हा परिषद ३५, महानगरपालिका कोल्हापूर ४५ या विभागांकडे वीस पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page