December 27, 2025

महाराष्ट्रातील 12 मान्यवर पद्म भूषण, पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

0
20240126_123151

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

यामध्ये  प्रसिध्द साहित्यिक हरमसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विनी मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील 12 मान्यवर पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ञ आश्विन मेहता, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक,  कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे.

बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्याजीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय  मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून . जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी  उदय देशपांडे यांनी  अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे. 50 देशांतील 5,000हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली.

वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक  वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर  काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. व्यावसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.

या वर्षी एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 05 पद्म विभूषण, 17 पद्म भूषण आणि  110 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. भारतरत्न नंतर भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी 2024 रोजी करण्यात आली. 1954 मध्ये स्थापन करण्यात आलेले, हे पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी व्यक्तींना ओळखतात. पद्म पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केली जाते. यामध्ये कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध श्रेणींचा समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page