‘नाद’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न
मुंबई : ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. एका हार्ड लव्हस्टोरीला धडाकेबाज अॅक्शनचा तडका देताना सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न ‘नाद’मध्ये करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांची पसंती लाभल्यानंतर यातील सुरेल गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. ‘नाद’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.‘
‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच ठाणे येथील आयबीस हॉटेल येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. अभिनेत्री शिवाली परब आणि उत्कर्ष शिंदे यांच्या सहजसुंदर सूत्रसंचालनाने नटलेल्या या सोहळ्याला अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याखेरीज चित्रपटातील प्रमुख कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक व निर्मातेही हजर होते. याप्रसंगी बोलताना प्रसाद ओक यांनी ‘नाद’च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार आहेत. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. ‘नाद’ चित्रपटामध्ये दोन रोमँटिक, एक सॅड आणि एक धमाल नाचो गीत अशी एकूण चार गाणी आहेत. सर्व गाणी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत.
