December 26, 2025

एका ‘रील स्टार’चा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास १४ नोव्हेंबरला होतोय प्रदर्शीत

0
IMG-20251104-WA0253

कोल्हापूर : मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तव जीवनाचे यथार्थ दर्शन घडवत अंतर्मुख करणारा ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट १४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सशक्त कथानक, कसदार अभिनय, नेत्रसुखद सादरीकरण, प्रयोगशील दिग्दर्शन, सुमधूर गीत-संगीत अशा बऱ्याच वैशिष्ट्यांनी नटलेला ‘रील स्टार’ प्रेक्षकांचे परिपूर्ण मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
या चित्रपटात रील स्टारची गोष्ट पाहायला मिळणार आहे. आजचा जमाना रील स्टारचा आहे. आज मनोरंजनासोबतच समाजात घडणाऱ्या घटना आणि जनमानसांत उमटणारे प्रतिबिंब टिपण्याचे काम रील स्टार करत आहेत. ‘रील स्टार’ चित्रपटामध्ये भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा आहे. हा चित्रपट म्हणजे भानुदासच्या स्वप्नपूर्तीचा अनोखा प्रवास आहे. स्वप्नांना गवसणी घालताना त्याने दिलेला लढा पाहण्याजोगा असून, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
भारतातील काही सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मल्याळम चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली ‘रीलस्टार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मल्टीस्टारर हिंदी-मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी दिग्दर्शन केले आहे. सिम्मी आणि कृष्णा एंटरप्रायझेस हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकुर्णी यांनी लेखन केले आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या मुड्समधील आणि वेगवेगळ्या प्रसंगाना अनुसरून एकूण पाच गाणी आहेत. ‘दृश्यम’ फेम संगीतकार विनू थॉमस यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीतसाज चढवला असून, एक गाणे संगीतकार शुभम भट यांनी संगीतबद्ध केले असून शुभम भट यांनी सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे सहायक म्हणून काम केले आहे.
या चित्रपटामध्ये भूषण मंजुळे, उर्मिला जे जगताप, प्रसाद ओक, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनय पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, जगदीश हाडप, पुनम राणे, अभय शिंदे, अनिल कवठेकर, विनिता शिंदे, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले आदी कलाकार आहेत. याशिवाय बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत. या चित्रपटातील व्यक्तिरेखांना भागवत सोनावणे यांनी रंगभूषा केली असून, राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page