रील्सवरील कलाकारांचा प्रवास सांगणाऱ्या ‘रीलस्टार’ चित्रपटाचा मुहूर्त
कोल्हापूर : चित्रपटाचा प्रवास रीळांपासून सुरु झाला. पण अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमातून रीळं गायब झाली. आता ‘रील्स’द्वारे मोबाईलच्या माध्यमातून नवी संकल्पना प्रत्येकाच्या हातात आली आहे. रिल्स बनवून त्या द्वारे काही ना काही संदेश देत मनोरंजन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा प्रवास ‘रील स्टार’ या आगामी चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येणार आहे. ‘रील स्टार’ या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला.
जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली निर्माते जोस अब्राहम यांनी ‘रीलस्टार’ या आगामी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस दिग्दर्शन करीत आहेत. रील्स करणाऱ्या तळागाळातील कलाकारांनी केलेल्या स्वप्नांचा पाठलाग म्हणजेच ‘रीलस्टार’ हा चित्रपट आहे. रील बनवणाऱ्या स्टार्सचा प्रवासही वाटतो तितका सोपा मुळीच नसतो. रील स्टार बनण्यापर्यंत त्यांना करावा लागणारा संघर्ष आणि स्वप्नांचा पाठलाग करताना मोजावी लागणारी किंमतच त्यांना खऱ्या अर्थाने ‘रील स्टार’ बनवतात. या चित्रपटातही काहीसं अशाच प्रकारचं कथानक पाहायला मिळणार आहे.
नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, राजेश मालवणकर, सरीता मंजुळे, महेंद्र पाटील, कल्पना राणे, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हसदे हे कलाकार भुमिका साकारणार आहेत.
