अमानवी सती प्रथेवर आधारीत ‘सत्यभामा’ चित्रपट
मुंबई – प्रेरणादायी कथानक असलेला ‘सत्यभामा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. सती जाण्याच्या अमानवी प्रथेवर आधारित असलेला ‘सत्यभामा’ ८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट श्रीमती मनीषा पेखळे यांनी लिहिलेल्या ‘सत्यभामा – एक विसरलेली गाथा’ या कादंबरीवर आधारलेला आहे. ही कथा सती प्रथेला बळी पडलेल्या सर्व निष्पाप स्त्रियांना समर्पित आहे. सतीचे दु:ख जगासमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. १९व्या शतकातील ही काल्पनिक कथा आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक द्वयी म्हणाले की, ‘सत्यभामा’ची १९व्या शतकातील कथा आजही मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. ही भाऊ बहिणीच्या प्रेमाची, त्यांच्या जीवनातील आनंदाच्या क्षणाची, त्यागाची व त्यांनी केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे. डोळ्यांत अंजन घालणारी एक तेजस्वी आणि प्रेरणादायी कथा दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे मनोरंजकरीत्या ‘सत्यभामा’मध्ये सादर करण्यात आली आहे.
श्री साई श्रुष्टी फिल्म्स एलएलपी प्रस्तुत ‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे, सारंग मनोज, अंकुर सचदेव आणि वीरल दवे यांनी केली आहे. सारंग मनोज आणि अभिजीत झाडगावकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन मनीषा पेखळे यांनी केले आहे. आगीत होळपरणाऱ्या स्त्रीचा हात धरलेला पुरुषाचा हात पाहायला मिळतो. पुरूषाच्या हातात राखी दिसत आहे. मनाला चटका लावणारे हे पोस्टर ‘सत्यभामा’बाबत उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे.
या चित्रपटात माधव अभ्यंकर, अभिजीत आमकर, भाविका निकम, सृष्टी मालवंडे, ज्योती पाटील, सारंग मनोज, ज्ञानेश्वर शिंदे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. डिओपी जितेंद्र रामचंद्र आचरेकर यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, मनीषा पेखळे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निखिल महामुनी यांनी संगीत दिले आहे. हनी सातमकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.
