November 1, 2025

‘रील स्टार’ चित्रपटात श्रीमंतांच्या वागणुकीचे वास्तवदर्शी चित्रण

0
IMG-20250907-WA0137

कोल्हापूर : ‘रील स्टार’ या चित्रपटात श्रीमंत व उच्चभ्रू लोकांची नीतिमत्ता आणि ते सामान्य लोकांशी कसे वागतात याचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. ‘रील स्टार’ मराठीतील प्रचलित साहित्यिक सिद्धांत आणि सिनेमॅटिक संकल्पनांना आव्हान देत, एक नवा प्रवाह निर्माण करणारा सिनेमा घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा चित्रपट या दिवाळीत थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
‘रील स्टार’ हा चित्रपट भानुदास नावाचा एक रस्त्यावरील विक्रेता आणि त्याच्या कुटुंबाची कथा मांडतो. आपल्या आयुष्यातील एका छोट्याशा स्वप्नाच्या पूर्ततेसाठी ते झगडतात; मात्र अनपेक्षित संकटांच्या मालिकेत अडकून त्यांची ही कहाणी हळूहळू समकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वास्तवात प्रवेश करते. या कौटुंबिक चित्रपटातील भानुदासच्या हृदयस्पर्शी कथेला सस्पेन्स-थ्रिलरचीही जोड देण्यात आली आहे. शेवटी त्याला स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांविरुद्ध अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतो. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासह प्रसाद ओक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. यावेळी नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळेही तितक्याच प्रभावी भूमिकेत आहे. एका ख्यातनाम न्यायाधीशाच्या मृत्यूमागील सत्य उलगडणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत प्रसाद ओक यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
भारतातील काही सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मल्याळम चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यासोबतच या चित्रपटात मराठीतील आघाडीचे कलाकारही आहेत. कथेला अनुकूल असलेली हृदयस्पर्शी गाणी या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. ‘दृश्यम’ या प्रसिद्ध मल्याळम चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक विनू थॉमस यांनी गुरु ठाकूर आणि मंदार चोळकर यांच्या गीतांना संगीत दिले आहे. चित्रपटातील पाच गाणी आघाडीचे मराठी गायक आदर्श शिंदे, मनीष राजगिरी, रोहित श्याम राऊत, अभिजित कोसंबी, सायली कांबळे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायली आहेत.
प्रसाद ओक, भूषण मंजुळे, मिलिंद शिंदे, उर्मिला जगताप, कैलाश वाघमारे, अनंत महादेवन, स्वप्नील राजशेखर, अभिनव पाटेकर, रुचिरा जाधव, तनिष्का मानसी, मास्टर अर्जुन आणि इतर कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट नागराज मंजुळे यांचे सहकारी दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या सुधीर कुलकुर्णी यांनी लिहिला आहे. ‘अन्य’ या हिंदी-मराठी चित्रपटानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन सिम्मी आणि रॉबिन यांनी केले आहे. जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी याची निर्मिती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page