“गौरव माय मराठीचा” तून महाराष्ट्रीय कला, संस्कृतीचे दर्शन
कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव २०२४ कोल्हापुरात ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ऐतिहासिक शाहू मिल येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापुरातील जनतेला कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव, कोल्हापुरातील लोककला-लोकसंस्कृती, कोल्हापूरात चालत असलेली मर्दानी खेळाची परंपरा, शिवकालीन शस्त्र त्याच सोबत खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम. गुरुवारी गौरव माय मराठीचा या कार्यक्रमातून महाराष्ट्रीय गीत व नृत्य संस्कृतीचे दर्शन झाले. शिवरायांवरील गाणी, पोवाडा, मराठी लावणी, देऊळवाला, अभंग, कोकणी गीतांसह अनेक कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दास्ता-ए-हिंदुस्थान मधून सारेगम लिटल चैम्प फेम देवांश भाटेने कोल्हापूरकरांची मने जिंकली. सुरेश वाडकरांचा भूतनाथ, कोल्हापूरचा चुळबुळ भाटे म्हणून ओळख असलेल्या देवांशने आपल्या आवाजातून विविध हिंदी मराठी गाणी गायली. यात नन्हा मुन्ना राही हू, जयस्तुते, सैराट झालं जी, राम का गुणगान आणि जेव्हा तुझ्या बटांना ही गाणी गायली.
याचबरोबर याठिकाणी सुरु असलेल्या प्रदर्शनीय कलादालनाला आज कोल्हापूरकरांनी दाद दिली. खाद्य संस्कृती पाहण्यासाठी व तिचा आस्वाद घेण्यासाठी सहकुटुंब कोल्हापूरकर आले. यात कोल्हापुरी व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ यांचे स्टॉल तसेच इतर खाद्य पदार्थ यांची रेलचेल याठिकाणी उपलब्ध आहे. कलादालनात ऐतिहासिक वारसा दर्शविणाऱ्या शस्त्र व अज्ञापत्रं पाहण्यासही कोल्हापूरकर व्यस्त दिसले. उद्या जागर लोककलेचा व शाहीर विजय जगताप यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. पुढील तीन दिवस हा महोत्सव सुरु असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन पाटील, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, प्रमोद पाटील, उदय पाटील यांनी उपस्थित कलाकारांचे स्वागत आणि सन्मान केला.
महोत्सवात कोल्हापुरी फ़ूड स्टॉल लागले असून यात जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या बचत गटांनी स्थानिक खाद्य पदार्थ विक्रीस ठेवले आहेत. यात तांबडा पांढरा रस्सा आणि झुणका भाकर थालपीठ यासह कांदा भजी, बिर्याणी, पुरण पोळी, सेंद्रिय गूळाचा चहा अशा पदार्थांचा समावेश आहे. याचबरोबर पाणी पुरी, बटाटा स्प्रिंग रोल, वडापाव, चिकन खिमा, रक्ती मुंडी, छोले बटुरे असे विविध खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत.
