प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारी शॉर्टफिल्म ‘दर्पण’
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या अभिलाष मराठे लिखित आणि त्यांचीच प्रमुख भूमिका असलेली ‘ दर्पण ‘ ही शॉर्टफिल्म देशातील अनेक शॉर्टफिल्म स्पर्धांमध्ये ठसा उमठवण्यासाठी सज्ज झाली आहे केदार माने यांनी ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे.
लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याच काही धोरणांमुळे अनेक अडचणी येत असतात, एकाकीपणा येत असतो. यातून अनेक तरुण टोकाच्या भूमिका घेताना आपण पाहत आहोत. पण माणसाच्या या अवस्थेचे उत्तर अनेकवेळेस त्याच्याच आतमध्ये असते. हेच दाखवण्याचा प्रयत्न करणारी एक शॉर्टफिल्म कोल्हापूरच्या तरुणांनी बनवली आहे.
शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात जॉब करत असताना कोल्हापुरातील काही संवेदनशील तरुणांनी एकत्र येत दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर रिल्स मधून लोकांना हसवण्याचे आणि सामाजिक संदेश देण्याचे काम सुरू केले. याच पार्श्वभूमीवर एक वर्षापूर्वी या तरुणांनी ‘Kop Wires’ नावाने चॅनल सुरू करून आपले प्रयोग सुरू ठेवले. आता त्यांनी पहिल्यांदाच ‘ दर्पण ‘ ही सुंदर शॉर्टफिल्म बनवली असून यातून आपल्या मनाच्या अवस्था मांडल्या आहेत.
कुठे ना कुठे प्रत्येक माणसाला अंतर्मुख करून विचार करायला लावणारी ही शॉर्टफिल्म असून प्रत्येकाने ही दहा मिनिटांची फिल्म आवर्जून बघावी असे आवाहन अभिलाष आणि त्याच्या टीमने केले आहे. असेच वेगळे प्रयोग करून समाजात लोकांना त्यांच्या भावनिक अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात रंग भरण्यासाठी सहाय्य करणार असल्याचे यावेळी या टीम ने सांगितले.
