December 27, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0
IMG_20241224_191053

मुंबई : संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. “संगीत मानापमान!” हा संगीतमय चित्रपट १० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमावेळी म्हणाले गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात असते, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालणारे नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते. मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपले मराठी संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. असे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच “भामिनी” चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, तसेच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलासची भुमिका सुमित राघवन ह्यांनी केली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणारा असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती, संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणाऱ्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटात भव्यता पाहायला मिळतेय. संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
“जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे म्हणाल्या संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम, संस्कृती, कला, परिश्रम याचं प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page