वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा – राज्यपाल रमेश बैस
पुणे : विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.
राज्यपाल बैस म्हणाले, नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाच प्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल
शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल.
