November 2, 2025

महापालिकेच्या शाळेची मुले निघाली विमानाने इस्रोला

0
IMG-20240205-WA0258

कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळेतील इयत्ता ५ वी च्या १७ विद्यार्थ्यांनी शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन ISRO च्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी आज प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्गदर्शक शिक्षक, एक महिला डॉक्टर व १७ विद्यार्थ्यांच्यासह बेंगलुरुकडे रवाना झाले आहेत.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात हे प्रथमच घडले आहे. या विद्यार्थ्यांना ISRO च्या अभ्यास दौऱ्यासाठी आज पाठविताना महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून ‘भविष्यात अशा प्रकारचे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वांनी यशस्वी व्हावे’ अशा शुभेच्छा दिल्या. आजच्या युगात भविष्यात अनेक क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत, आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या कलानुसार सखोल अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे असे त्यांनी त्यांचा सत्कार करताना सांगितले.
या अभ्यास दौऱ्यासाठीचा येणारा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असून आज मुलांना सहलीस पाठवण्यासाठी मुलांच्या पालकांनी व नातेवाईकांनी महापालिकेत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. कोल्हापूरच्या परिवहन विभागातर्फे विद्यार्थ्यांना विमानतळापर्यंत नेण्यासाठी खास विशेष बसचे आयोजन केले होते. सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील चौकामधून विशेष बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, इचरकरंजीचे प्रशासक ओमप्रकाश दिवटे व अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या उपस्थितीत प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, शुभेच्छापत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ल.कृ.जरग विद्यालय जरगनगर, नेहरूनगर वसाहत विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय या महापालिका शाळांचा समावेश आहे. याप्रसंगी शिक्षक समितीमार्फत पेन व डायरी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. तर अग्निशमन विभागामार्फत फुड पॅकींग व पाण्याची बाटली विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, अग्नीशमन अधिकारी मनिष रणभिसे, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, सचिन पांडव, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, संजय शिंदे, राजेंद्र आपुगडे, शांताराम सुतार, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page