एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे पुणे येथे ‘भारतीय छात्र संसद’
कोल्हापूर : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३ वी भारतीय छात्र संसद दि.१० जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजित केली आहे. अशी माहिती समन्वयक रवी पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी परिक्षा नियंत्रक डॉ. बी.एम.हिर्डेकर व रामहरी रुईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार आहे.
या संसदेचे उद्घाटन, दि.१० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. होईल. देशाची माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, यूके पार्लमेंटचे हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य मेघनाद देसाई, माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण मा. शरद पवार, व्हरमौंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमला आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्रा.राम चरण हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच, दि.१२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता समारोप होईल.
या छात्र संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली गेली आहेत. यामध्ये १) राजकारणातील युवा नेतृत्व-वक्तृत्व किंवा वास्तव, २)युगांतर – संक्रमणातील तरूण, ३)लोकशाही २.० एआय आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत,४) आमच्या संस्कृतीत लोककलेची शक्ती, डेटा, ५)विविधता आणि लोकशाही- कास्ट जनगणना दुविधा,६)आपण चंद्रावर उतरलो, पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत ? याविषयांचा समावेश आहे.
याशिवाय विशेष ‘युथ टू युथ कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे.
