महिलांच्या अंगावरील ५ लाखाच्या दागिन्याची लूट
शिरोली : ऐन दिवाळी सणात अज्ञात चोरटयाने शिरोली एमआयडीसी भागात दिवसाढवळ्या भर रस्त्यावर दोन महिलांच्या अंगावरील सुमारे पाच लाखांचा सोन्याचा ऐवज लुटला. यामुळे महिलांच्यात भीती निर्माण झाली आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी भागातील मेनन पिस्टन समोर एकाच ठिकाणी एक तासात महिलांच्या अंगावरील सोने लुटण्याच्या दोन घटना घडल्या. यामध्ये हेरले आणि चोकाक या गावातील दोन कुटुंबातील दोन महिलांचे सुमारे सहा तोळे दागिने लुटले गेले.
हेरले ता. हातकणंगले येथील सौ. माधुरी प्रकाश पाटील या आपल्या पती समवेत शनिवारी सकाळी ९.०० वशी ता.वाळवा या गावाला निघाले होते. ते शिरोली एमआयडीसी भागातील मनुग्राफ कंपनीसमोरआले असता. पल्सर मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने पाठीमागे बसलेल्या माधुरी यांच्या गळ्यातील सुमारे साडेतीन तोळ्याचे गंठन हिसडा मारून लंपास केले.
त्यानंतर एक तासात याचठिकाणी सकाळी १० वाजता दुसरी घटना घडली. चोकाक गावातील सौ. विमल दादासो शिंदे या मुलग्याच्या मोटारसायकल वरून गावाला जात होत्या. मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने शिंदे यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्याचे लक्ष्मी हार व गंठण हिसडा मारून लंपास केले.
यावेळी त्या अज्ञात व्यक्तीच्या गाडीचा नंबर मिळाला आहे.
या चोरट्याचा दोघांनीही पाठलाग केला होता. पण तो टोप संभापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेला. या दोन्ही घटनेमुळे ऐन दिवाळीत हतबल झालेले दोन्ही कुटुंबांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही चोरीचे गुन्हे दाखल झाले असून स. पो. नि. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.
