शिरोलीत एका रात्रीत तीन घरफोड्या; दागिन्यासह रोख रक्कम लंपास
शिरोली : शिरोली पुलाची गावातील दोन बंद घरांची कुलुपे तोडून अज्ञात चोरटयानी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५ लाखाहून अधिक किंमतीचा माल चोरून नेला. तर महामार्गालगतच्या एका बंद हॉटेलचे कुलुप तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोलीतील मोरे गल्ली येथे रहाणारे आणि वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे दत्तात्रय बाळासो सुर्यवंशी, वय ३६ हे आपल्या घराला कुलुप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास कुलुप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे गंठण, दोन अंगठ्या, कानातील टॉप्स, चांदीचे छल्ला, अंगठ्या, पैंजण, कडे आणि रोख रु २ लाख ३० हजार रुपये असा माल चोरून नेला.
दुसरी घरफोडी जय शिवराय तालमीजवळ रहाणाऱ्या मिनाक्षी महादेव स्वामी यांच्या घरात झाली. त्यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागीने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही चोरी नेमकी कीती रक्कमेची झाली हे समजू शकले नाही. तर तिसरा प्रकार महामार्गालगत असलेल्या हॉटेल आमंत्रणमध्ये घडला. या बंद हॉटेलचे कुलुप तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला. त्यानां काही मिळाले नाही. एका रात्रीत घडलेल्या तीन चोरीच्या प्रकरामुळे शिरोली परिसरात घबराट पसरली असून घटनेचे पंचनामे करताना पोलीसांची धावपळ उडाली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास स. पो. नि. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमित पांडे करीत आहेत.
