शिये बालिका खून प्रकरणी विशेष तपास पथक : आरोपीस ५ दिवसाची पोलीस कोठडी
शिरोली : शिये ता. करवीर येथे दहा वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी बलात्कार आणि अमानुष मारहाण करून खुन करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीस जास्तीत जास्त लवकर व कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. हे पथक आवश्यक ती सर्व माहिती घेऊन त्याप्रमाणे कागदपत्रे तयार करतील व जलद गती न्यायालयात सादर करतील. जेणेकरून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
गुरुवारी शिये ता. करवीर येथील रामनगर परिसरात दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या बलात्कार व खुन प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले गुरुवारी शिये ता. करवीर येथे घडलेल्या घटनेचे गांभीर्य मोठे आहे. सखोल चौकशी व नराधम दिनेश कुमार केशनाथ साह याच्या विरोधात भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये दोन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक,एक महिला पोलिस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरोली एमआयडीसी पोलिस यांचा समावेश करण्यात आला आहे. हे येत्या पंधरा दिवसांत सर्व आवश्यक ती कागदपत्रे व पुरावे गोळा करतील. व न्यायालयात सादर करतील. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे.
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पिडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना आधार देत त्यांचे सांत्वन केले. दरम्यान याप्रकरणी आरोपी दिनेश कुमार केशनाथ साह याला कोल्हापूर येथील न्यायालयात हाजर केले असता न्यायालयाने दि. २८ आँगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
आय जी फुलारी पुढे बोलताना म्हणाले. शिरोली एमआयडीसी भागात रोजगार उपलब्ध असल्याने परप्रांतीय लोकांचे जथ्थे या परिसरात आले आहेत. त्यामुळे शिरोली, नागाव, शिये, टोप परीसरातील ते भाड्याने खोल्या घेऊन रहात आहेत. अशा परप्रांतीयांचे संबंधित गावातील सरपंच. ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनी जबाबदारी घेऊन त्यांची चौकशी करून दाखले, पुरावे गोळा केले पाहिजेत. त्यांची पार्श्वभूमी तपासणी करण्यात आली पाहिजे . त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
