शिरोली पोलिसांनी रोखला ‘भाई का ब~ड्डे’
शिरोली : पोलीस ठाण्यात खून, बनावट नोटासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि भाईगिरी करणाऱ्याचा वाढदिवस मोठमोठे डिजिटल फलक लावून जल्लोषात साजरा होणार होता. पण हा बर्थडे पोलिसांनी रोखला आणि वाढदिवसासाठी घालण्यात आलेले स्टेज, डिजिटल फलक काढण्यास भाग पाडले.
शिरोली, तावडे हॉटेल, गांधीनगर परिसर, शिरोली टोलनाक्याची भव्य कमान अशा ठिकाणी एका वाढदिवसाचे फलक झळकले. ज्याचा वाढदिवस होता तो खून, मारामाऱ्या, बनावट नोटा अशा गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी. तरीही त्याच्या वाढदिवसासाठी शिरोलीतील भर चौकात मोठा डिजिटल लावून स्टेज उभारण्यात आले होते. तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी गांधीनगर मधील अनेक मोठमोठ्या व्यापाऱ्यांची मुले आलिशान गाड्या घेऊन आली होती. याबाबत शिरोली पोलीस ठाण्यात काही फोन गेले आणि शिरोलीत पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी हा वाढदिवस करण्यास मज्जाव तर केलाच पण डिजिटल फलक आणि स्टेजही काढून घेण्यास भाग पाडले. अर्थातच बर्थडे बॉयसह समर्थकांनी कोणालातरी फोना-फोनी करून वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही आणि वाढदिवस साजरा न करताच सर्वांना माघारी फिरावे लागले. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले.
