कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार करणाऱ्या कंपनीच्या ५ भागीदारांवर गुन्हा दाखल
शिरोली : कंपनीत नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांची २३ लाख १९ हजार ४४९ रुपये इतकी कामगार भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर वापरून अपहार केल्याबद्दल संभापूर ता. हातकणंगले येथील वारणा इंडस्ट्रीज कंपनीचे भागीदार असलेल्या गुळवे कुटुंबीयातीन ५ जणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, टोप संभापूर येथील वारणा इंडस्ट्रीज या कंपनीकडे नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांची एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीमधील २३ लाख १९ हजार ४४९ रुपये इतकी कामगार भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर येथे न भरता स्वतःच्या फायद्याकरिता वापरली.
याबाबतची तक्रार कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी, क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर प्रवर्तन यांचेकडे केली. याबाबत रितसर तपासणी करून भविष्य निर्वाह निधी, क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर प्रवर्तन अधिकारी / लेखा अधिकारी हेमंत श्रीनिवासराव जेवळीकर यांनी शिरोली पोलिस ठाण्यात दिली असून, त्याप्रमाणे संचालक चित्रसेन नागनाथ गुळवे, सुरेखा चित्रसेन गुळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वाती महाजन, हरीदास चांगदेव जोधावे, स्वाती चित्रसेन गुळवे, यांचेवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
