शिरोलीत महामार्गालगतच बंद पडलेल्या हॉटेलात खुलेआम जुगार अड्डा
शिरोली : येथील महामार्गालगत सांगली फाटा ते दर्गा दरम्यान धाबा कम हॉटेल सुरू होते ‘मेव्हणे- पाहूणे’ असे वेगळे नाव असलेले हॉटेल काही दिवसापूर्वी बंद पडले. आता याच हॉटेलमध्ये बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू झाला असून रात्रंदिवस राजरोसपणे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर कारवाई कशी होत नाही याबाबत आश्चर्यजनक चर्चा होत आहे.
हा जुगार अड्डा सुरू असलेल्या ठिकाणी दर्शनी भागात बांबूची वेगळी सजावट, मेव्हणे- पाहुणे असे वेगळे नाव. समोर महामार्गाचीच वाहन पार्किंग साठी जागा इतके असूनही जेवणाचा दर्जा घसरल्याने चालकाला हॉटेल बंद करावे लागले. याच हॉटेलमध्ये आता मोठ्ठा जुगार अड्डा सुरू झाला आहे. ग्रीन हाऊसला वापरले जाणारे हिरवे किलतान वापरून समोरचा भाग पूर्णपणे बंदिस्त करून आत जाण्यापुरता छोटा दरवाजा केला आहे. बाहेर दबकी शांतता, रात्री उजेडासाठी एक बल्ब देखील नसला तरी आत मात्र सर्व सोयी उपलब्ध करून देताना कारवाई होणार नाही यांचीही दक्षता आणि हमी असल्याने या ठिकाणी जुगार खेळायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
हाच जुगार अड्डा काही दिवस शिरोलीतील नागरी वस्तीत सुरू होता. याबाबत नागरिकांनी तक्रार देताना आंदोलनाचा इशारा दिला होता. तेथून बंद केल्यानंतर आता जुगार अड्डा चालकाने थेट गावाच्या बाहेर पण रात्रंदिवस वहानांची वर्दळ असलेल्या महामार्गालगत हा जुगार अड्डा सुरु केला.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी काही दिवसापूर्वी मौजे वडगाव हद्दीत आडरानांत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम, वाहने, मोबाईल सह आठ जणांना अटक केली होती. पण आता भर महामार्ग असलेल्या रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्डयाकडे होणऱ्या पोलीसांच्या दुर्लक्षाचा नेमका ‘अर्थ’ काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
