शिरोलीत विजेच्या धक्क्याने नवाविवाहित युवकाचा जागीच मृत्यू
शिरोली : अवघ्या ६ महीण्यापूर्वी विवाह झालेल्या शिरोली पुलाची माळवाडी येथे रहाणाऱ्या युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. नवज्योत महादेव मोंगले वय २२ असे या युवकांचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली.
. या घटनेची अधिक माहिती अशी की गरीब, शेतकरी कुटुंबातील नवज्योत याने घराजवळच सर्व्हिसींग सेंटर सुरु केले होते. या सेंटरवर बसवलेल्या विद्युत मोटारीच्या कनेक्शनच्या वायरचे कोटींग निघुन आतील तार मोटरला चिकटली होती. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नवज्योत शेतातून जनावरांना वैरण घेऊन आला आणि हातपाय धुण्यासाठी विद्युत मोटर चालू केली. त्याचवेळी मोटारीतील विजप्रवाह पाण्याबरोबर प्रवाहीत झाला आणि नवज्योतच्या हातातील पाण्याला त्याचा स्पर्श होताच विजेचा जोराचा धक्का बसून तो जागीच कोसळला. त्याला तातडीने हॉस्पिटल नेले. पण डॉक्टरनी तो मयत झाल्याचे सांगीतले. अतिशय कष्टाळू, मनमिळावू स्वभावाच्या नवज्योतचा कौंटुबिक तसेच मित्र परिवारही मोठा होता. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील तरुण हळहळ व्यक्त करीत सहभागी झाले होते.
