संतप्त शेतकऱ्यांकडून राजाराम कारखान्याच्या एमडीनां मारहाण
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून विरोधी गटाच्या सभासदांचा ऊसच तोडून नेला जात नसल्याच्या निषेधार्थ सतेज पाटील गटाने काढलेल्या मोर्चाचे पडसाद कारखान्यावर पडले. आ. सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आणि ऊसतोड थांबलेल्या शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना बावड्यातील भर रस्त्यावर मारहाण केली.
विरोधी आघाडीच्या शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड देत नसल्या बद्दल जाब विचारण्यासाठी राजर्षी छत्रपती परिवर्तन आघाडीच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहू मार्केट यार्डातील प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर आज मंगळवारी (दि. २) धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा संपल्यानंतर कसबा बावडा येथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक चिटणीस आपले काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्ली समोर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. एमडी चिटणीस यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात केली. यावेळी मागचा एक महिनाभर शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. जमलेल्या शेतकऱ्यांनी वाहनावर लाथा मारल्या तर वाहनाचा दरवाजाही तोडला. संध्याकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने परिसरात मोठी गर्दी जमली होती. दहा मिनिटे सुरू राहिलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी झाली. काहींनी मध्यस्थी करून कार्यकारी संचालक चिटणीस यांना पुन्हा गाडीत बसवले आणि त्यांची गाडी मार्गस्थ केली.
आजच्या घडीला जिल्ह्यात उसाची कमतरता आहे. रोज राजाराम कारखाना दोन तास बंद असतो. मात्र सभासदांचा ऊस कारखाना उचलत नाही. निवडणुकीत विरोधात प्रचार केलेल्या सभासदांना त्रास दिला जात आहे. बी आर माने यांच्या पावतीसमोर विरोधक लिहिल्याचा आरोप यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला.
जे विरोधक आहेत त्यांचा ऊस घेऊन जायचं नाही असले षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्याचा निषेध करून साखर आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. तीन वर्ष उस नेला नसल्यास पोटनिमानुसार सभासद व रद्द होते. विरोधक सभासद संपवण्याचा डाव सत्ताधारी आखत असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला.
