शिरोलीतील पेट्रोल पंपात अनैतिक संबधातून एकास बेदम मारहाण
शिरोली : अनैतिक संबधाच्या प्रकरणातून एका तरुणास बेदम मारहाण केल्या प्रकरणी शिरोली येथील पेट्रोल पंप चालक आकाश अमोल कोरगांवकर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कोल्हापूरातील न्यू पॅलेस परिसरात रहाणारे आकाश अमोल कोरगावकर व राज अमोल कोरगावकर हे शिरोली येथे पेट्रोल पंप चालवतात. त्यांचा कनाननगर परिसरात एक जिमही आहे. याच जिममध्ये येणारे शक्ती विक्रम भोसले वय 32 रा. शाहुपूरी ४थी गल्ली याच्याशी राज आणि त्याच्या पत्नीशी ओळख झाली. यातूनच शक्ती आणि राज याच्या पत्नीचे अनैतिक संबंध जुळले. त्यामुळे राज मानसिक तणावात होता. याचा राग मनात धरून आकाश याने शक्तीला शिरोली येथील पंपात बोलवून घेतले. आणि या ठिकाणी पंपातील खोलीत आकाश याने शक्तीला लोखंडी रॉड आणि लोखंडी पाण्याच्या बाटलीने बेदम मारले. यामध्ये शक्ती भोसले हा गंभीर जखमी झाला. शक्ती याने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार आकाश अमोल कोरगांवकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. स. पो. नि. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार पाखरे अधिक तपास करीत आहेत.
