शिरोली, संभापूर मध्ये अवैध मावा, दारू विक्रेत्यांवर कारवाई
शिरोली : गेले अनेक महिने शिरोली परिसरात सुरु असलेल्या अवैध गुटखा, मावा, दारू वाहतूक विक्री करणाऱ्यांवर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघांवर गुन्हे दाखल करून एक लाख रुपयाचा मुद्देमाल आणि ७०हजार रु किमतीची एक इलेक्ट्रिक बाईक जप्त केली.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मावा तयार करण्यासाठी लागणारी तंबाखूजन्य पत्तीची वाहतूक करताना जावेद जहाँगीर मिरजकर (वय ३९, रा.एकता कॉलनी पुलाची शिरोली) यास शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच हजार रुपयांची तंबाखूजन्य पत्ती व सत्तर हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक बाइक असा सुमारे पाऊन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरजकर हा शिरोली औद्योगीक वसाहतीतील जाफरानी वजन काट्याजवळ माव्यासाठी लागणारे तंबाखूजन्य पत्ती सिमेंटच्या पोत्यातून वाहतूक करीत होता. त्याची गाडी थांबवून झडती घेतली असता त्या पोत्यामध्ये अवैद्य तंबाखूजन्य पत्ती. आढळून आली.
संभापूर गावात सुमारे ९२ हजार रुपयांची अवैध दारू विक्री प्रकरणी जयश्री कृष्णात भोसले (वय ५४) या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. संभापूर येथील तासगाव रोडवरील भोसले गल्लीमध्ये अवैध देशी-विदेशी दारू व बियर विक्री केली जात असल्याने पोलिस कर्मचारी विद्या परीट यांनी भोसले यांच्या घरात छापा टाकला. यावेळी ९२ हजार ५०५ रुपये किंमतीची देशी विदेशी दारू व बियरचे बॉक्स सापडले. याबाबत जयश्री भोसले यांच्यावरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 गावांच्या परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू, गुटखा, मटका, जुगार अड्डे, तंबाखूजन्य नशिले पदार्थांची वाहतूक, विक्री अवैध घरगुती गॅस विक्री यावरही कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
