November 2, 2025

शिरोलीत फोफावले गँगवॉर, बेकायदेशीर धंदे : पोलिसांसमोर आव्हान

0
GridArt_20241125_185212331

शिरोली : शिरोली पुलाची येथील वाड्या, वस्त्या आणि माळ भागात बेकायदेशीर दारू, गुटखा, गांजा, विक्री. मटका, जुगार, अड्डे सुरू आहेत. चोरीच्या स्क्रॅपची खरेदी-विक्री जोमात सुरू आहे. यातूनच काही तयार झालेल्या टोळ्यांच्या गॅंगवॉरमुळे स्थानिक नागरिकांना कायम दहशतीखाली राहावे लागत आहे. याच टोळ्यांचे गॅंगवॉर आता जिल्हाभर पसरले आहे. आणि जिल्हा पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
शिरोली पुलाची गावातील माळ भागातील विलासनगर शास्त्रीनगर, डॉ.आंबेडकर चौक परिसर शिरोली एमआयडीसी लगत आहे. या ठिकाणची बहुतेक वस्ती बाहेरून, परराज्यातून आलेल्या कामगारांची आहे. त्यांच्यावर काही स्थानिकांनी बेकायदेशीर धंदे चालवून दहशत निर्माण केली आहे. या ठिकाणी बेकायदेशीर गावठी दारू, मटक्याचे, जुगाराचे अड्डे चालवणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. याच टोळ्यांकडून गांजा, गुटखाही विकला जातो. तसेच काही तरुणांना व्यसनाधीन बनवून गांजा विक्रीच्या धंद्याला लावले आहे. स्क्रॅप व्यवसायाच्या नावाखाली चोरीचा स्क्रॅपची खरेदी-विक्री केली जाते. या बेकायदेशीर धंद्यातून या ठिकाणी सातपुते, कोळी यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यांच्यात पैशाचा व्यवहार, वर्चस्ववाद यातून वाद, भांडणे, मारामाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार वारंवार होत असतात. याचे पर्यावरण आता खुनाची सुपारी, टोळीयुद्ध यामध्ये झाले आहे. बेकायदेशीर धंदे आणि मारामाऱ्या यामुळे रोहित सातपुते आणि त्याच्या गॅंगमधील अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . रोहित सातपुतेला नुकतेच एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. विनायक लाड-कोळी याने स्क्रॅप व्यवसायातून टोळी बनवली असून यातून त्याच्याच नात्यातील शिरोलीचा माजी उपसरपंच, सध्या ग्रामपंचायत सदस्य असलेला अविनाश कोळी, त्याचा भाऊ अभिजीत कोळी याच्याशीही त्याचा व्यावसायिक वाद सुरू आहे. पैशाचा वाद कोट्यावधी रुपयाचा असल्याने तो विकोपाला गेला आहे. त्याची मजल तर खुनाची सुपारी आणि एकमेकावर गोळीबार करण्यापर्यंत गेली आहे. अविनाश कोळी याच्या फॉर्च्यूनर, थार सारख्या महागड्या गाड्यांची तोडफोड झाली. त्यातून शिरोली, आदमापूर याठिकाणी एकमेकावर हल्ले, गोळीबार अशा घडलेल्या प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
शिरोली गावात प्रत्येक पानपट्टीवर आणि किरकोळ किरणामालाच्या दुकानात गुटख्याची राजरोसपणे बेकायदेशीर विक्री होते. विक्रीसाठी गुटखा पुरवणारे रिक्षा, टेम्पो यातून गांधीनगर, कर्नाटक भागातून गुटखा आणून दुचाकीवरून या दुकानदार आणि पानपट्टीवाल्यांना देतात. यादववाडीतील शिवानी हॉलजवळ नुकताच एक मोठा बेकायदेशीर जुगाराचा क्लब सुरू झाला आहे. भर नागरी वस्तीत रात्रंदिवस सुरू असलेल्या या जुगाराच्या क्लबबाबत तक्रारी करून पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे येथील नागरिक आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून या गुंडाच्या टोळ्यांवर आणि बेकायदेशीर धंद्यांवर ठोस कारवाई होत नसल्यामुळे शिरोलीतील गुन्हेगारीचे लोण आता जिल्हाभर पसरले आहे. याच सातपुते, कोळी टोळीला राजकीय गाव पुढार्‍यापासून बड्या नेत्यांपर्यंत काहीजण संरक्षण देत असल्याने या टोळ्यांची दहशत वाढली आहे. या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page