गांधीनगरात हपापाचा(हवालाचा?)माल गपापा?
कोल्हापूर : गांधीनगर हे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे व्यापारी केंद्र आहे तितकेच ते बनावटगीरीचे केंद्रही बनले आहे. सध्या कितीही डिजिटल बँकिंगचा जमाना असला तर रोख रकमेच्या मोठ्या प्रमाणात व्यवहार या ठिकाणी होतात. अर्थातच त्याची कारणे ही बनावट मालाची विक्री, कर चूकवेगीरी, काळा पैसा. हीच असल्यामुळे यातूनच येथील हवालाद्वारे होणारी मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाण-घेवाण, उलाढाल, आर्थिक वाहतूक अनेकांसाठी सोयीची बनली आहे. याचाच फायदा घेऊन रोख रकमेची मोठ्या प्रमाणात लूट या परिसरात वारंवार घडत आहेत. पण सर्वच चोरीचा मामला असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी प्रवृती असल्याने येथील अशा लाखो, कोट्यावधी रुपयांच्या लूटीचे प्रकार म्हणजे ‘हापापाचा माल गपापा’ अशी स्थिती आहे. अशा लुटीतील एक दोन प्रकारात रीतसर तक्रारी झाल्या. त्याचा तपासही झाला. पण त्यामध्ये नेमकी किती रक्कम होती? किती रक्कम लूटली? तपासात किती रक्कम सापडली?यातील तफावत हाच प्रामुख्याने चर्चेचा विषय बनला. अर्थातच त्याची उत्तरे मात्र गुलदस्त्यातच राहीली. गांधीनगरमध्ये गणेश टॉकीजजवळ नुकत्याच घडलेल्या लुटीच्या प्रकरणामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला.
गांधीनगरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अप्पूचे चप्पलचे दुकान होते. हेच हवालाचे केंद्र होते. चप्पलच्या छोट्या बॉक्स, पिशव्या, बॅग्स, मधून रोख रक्कमेची आवक जावक करताना याठिकणी नोटा मोजण्याची अनेक यंत्रे अक्षरशः रात्रंदिवस धडधडत होती. या प्रकरानंतर हे केंद्र येथून हलवले. यामध्ये आणखी काही बडी धेंडे सहभागी झाली. रक्कम ठेवण्याच्या जागाही बदलल्या. हवाला सुरुच राहीले. किंबहूना ते वाढतच राहीले. हवाला ही राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्तरावर बड्या धेंडांची गरज आहे. व्यावसायीक, व्यापारी, कर चुकवेगिरी करणारे, लाच घेणारे बडे अधिकारी, राजकीय नेते. काळा पैसावाले, इतकेच काय धार्मिक स्थळांनाही काळा पैसा पुरवणारे यांच्यासाठी हवाला हाच एक मार्ग आहे. आणि ते एक उघड गुपीत बनले आहे.
‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या म्हणी प्रमाणे हवालामध्ये ‘ज्याच्या हाती रक्कम तो मालक’ अशी स्थिती असते. याबरोबरच तक्रारी करून आपलेच पीतळ उघडे पाडून घेण्याच्या फंदात कोणी पड़त नाही. याचाच फायदा लूटमार करणारे घेत राहीले. मध्यंतरी ऐन निवडणूकीत एका टोळीने तावडे होटेल परिसरात असाच हात मारला. पण पोलीसानी अवघ्या काही तासात त्यानां जेरबंद केले.
दोन वर्षापूर्वी गांधीनगरातून अप्पूच्या दुकानातून रक्कम घेऊन निघालेल्या एका इसमाला एका टोळीने मुक्त सैनिक वसाहत येथे अडवून शिये फाटा येथे नेले आणि या ठिकाणी त्याला भर दिवसा लुटले. या प्रकरणात ४० लाखाची फिर्याद झाली तपास झाला आरोपी पकडले त्यांच्याकडून ८० लाख रुपये जप्त झाले असे सांगण्यात आले. तर ती रक्कम १ कोटी ४० लाख असल्याची चर्चा झाली.
स्मगलिंगमध्ये फाटक्या नोटांचे तुकडे एकमेकाला देऊन मालाची देवाणघेवाण करण्याचा प्रकार चित्रपटात आपण पाहतो, त्याचप्रमाणे हवालामध्ये कोडवर्ड, कोड नंबर, आणि आता मोबाईलवर पाठवलेल्या चलनी नोटांच्या नंबरची जुळवाजुळव अशा प्रकारे ओळख पटवून पैशाची देवाण-घेवाण केली जात असल्याचे बोलले जाते. अशा प्रकारे व्यवहार करणारे काही नियमित व्यक्ती आहेत. तर काही तातडीच्या कारणाने रक्कम देणारे-घेणारे येतात. अर्थातच त्यांना कोणाची तरी ओळख द्यावीच लागते.
नुकतीच गांधीनगरात अशीच रक्कम लुटल्याची घटना गणेश टॉकीज परिसरात घडली. ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रकमध्ये एका मोठ्या बॉक्समधून ही रक्कम पाठवण्यासाठी भरली होती. अर्थातच या बॉक्समध्ये रक्कम असली तरी स्टेशनरी माल आणि कापडाचे बॉक्स असल्याचे दाखवण्यात आले होते. पण रक्कम भरणारा आणि ठेवणाराच लुटारूंच्या टोळीत सामील झाला. आणि रक्कम लुटली गेली. याची तक्रार एका होलसेल स्टेशनरी व्यापार्याने केली. त्यामध्ये त्यांनी 50 लाख गेल्याचे सांगितले. पोलीस तपासात आरोपी सापडले आणि त्यांचेकडे रक्कम सापडली तब्बल १ कोटी ८० लाखाहून अधिक. वरची रक्कम दुसऱ्या घरफोडीतील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्रत्यक्ष हि रक्कम २ कोटी २० लाखाहून अधिक असल्याची चर्चा झाली. तर हीच रक्कम हवालाची असल्याचेही बोलले जात होते. पण रक्कम ज्याने पाठवली आणि ज्याच्यासाठी पाठवली तेही गुलदस्त्यात राहिले आणि यातील पूर्ण सत्य बाहेर आलेच नाही.
