कोल्हापुरातील सायबर चौकात ‘हिट अँड रन’ : २ ठार ६ जखमी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या सायबर चौकात आज भर दुपारी एका भरधाव कारने चार मोटरसायकलला जोरदार धडक देऊन उडवले. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये कारचालक जागीच ठार झाला. तर मोटरसायकल वरील एकाचा मृत्यू झाला. एका बालकासह ६ जण गंभीर जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की सायबर चौकात कोल्हापूर शहरातून शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या सँट्रो कार मधील चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटला. आणि कारने रस्त्यावरील चार मोटरसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अचानक घडलेल्या या थरारक घटनेमुळे चौकातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली. काही नागरिक आणि वाहन चालकांनी अपघातातील जखमींकडे धाव घेतली. कार मधील चालकाच्या डोक्याला आधीच काहीतरी इजा झाल्याने बँडेज केलेले होते. पण या अपघातात चालक ठार झाला.
शिवाजी विद्यापीठात वरिष्ठ पदावर हा कर्मचारी असल्याचे समजते. मोटरसायकल वरील एक बालक वरून लांब जाऊन पडले आणि जखमी झाले. एक टेम्पो चालक नितीन मोरे यांनी जखमींना इतरांच्या सहाय्याने टेम्पोत घालून राजारामपुरीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. या दरम्यान एका जखमीचा वाटेतच मृत्यू झाला. इतरांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनास्थळी राजाराम पोलिसांनी धाव घेऊन पंचनाम्यासह इतर सोपस्कार केले आणि येथील वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मयत आणि जखमींची माहिती घेण्याचे काम सुरू होते.
