नागाळा पार्कात अपार्टमेन्ट मध्ये साडे सहा लाखाच्या दागिन्यांची चोरी
कोल्हापूर – नागाळा पार्क परिसरातील हरीपूजापुरम मधील अपार्टमेंटमध्ये राहणारे ओंकार गुरुनाथ जोशी यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटून अज्ञातानी सुमारे साडेसहा लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी ओंकार जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांंत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
ओंकार गुरुनाथ जोशी या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबीयां समवेत राहतात. गुरुवारी जोशी हे आपल्या कुटुंबीयांसमवेत कामानिमित्त परगावी गेले होते. यावेळी शुक्रवारी पहाटे अज्ञातानी अपार्टमेंटच्या पिछाडीस असलेल्या कंपाऊंडच्या भिंतीवरून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी जोशी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यानी तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील रिंगा, टॉप्स, तोडे, अंगठी आणि चांदीची समई, ताट, आरती, पूजेचे साहित्य असा सुमारे 6 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
ही बाब शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या निदर्शनास आली. त्यांनी दूरध्वनीवरून जोशी यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. यानंतर ओंकार जोशी हे कुटुंबीया समवेत घरी परत आले. यावेळी चोरट्यांंनी तिजोरीतील दागिने लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलिसांंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
