शिरोलीतील सातपुते बंधुंवर खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल
शिरोली : शिरोली येथील माळवाडी विलासनगर परिसरात टोळी तयार करून दहशत माजवून एका व्यवसायिकास धमकावून ८० हजार रुपये वसुल करून दर महिन्याला सात हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या राहुल सातपुते आणि रोहित सातपुते या दोन भावांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यासह शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना अटक करण्यासाठी शिरोली पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की शिरोली परिसरात अवैध दारू गुत्ता चालवणे, मारामारी, खंडणी वसुली असे गुन्हे दाखल असलेले राहुल शहाजी सातपुते आणि रोहित शहाजी सातपुते या दोघा भावांनी शिरोली येथे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान चालवणारा संदेश रमेश पांचाळ वय ३० मूळ रा. हनुमान नगर इस्लामपूर याला 2023 पासून वारंवार धमकावून त्याच्याकडून 80 हजार रुपये वसूल केले. तसेच दरमहा सात हजार रुपये खंडणी देण्यासाठी त्याला जबर मारहाण केली. तसेच त्याच्या आई-वडिल आणि मुलांनाही भेटू दिले नाही. यामुळे वैतागून संदेश पांचाळ हा आपला व्यवसाय बंद करून इस्लामपूर येथे गेला. आणि त्या ठिकाणी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात राहुल सातपुते आणि रोहित सातपुते यांच्यावर खंडणी वसुली आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन तो शिरोली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार शिरोली पोलीस राहुल सातपुते आणि रोहित सातपुते यांना अटक करण्यासाठी गेले असता ते मिळून आले नाहीत. त्यांचा शिरोली पोलीस शोध घेत आहेत. स. पो. नि. पंकज गिरी याबाबत अधिक तपास करीत आहेत.
