शिरोलीत सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून जातीय तणाव ; एक जखमी
शिरोली : शिरोली पुलाची येथील एका तरुणाने सोशल मिडीयावर टिपू सुलतान आणि छ. संभाजी महाराज यांचे वादग्रस्त पोस्ट टाकली याबाबत हिंदुत्ववादी तरुणानी जाब विचारताना काहीजणांनी या पोस्टचे समर्थन केले यातून दोन गटात वादावादी झाली. वादाचे पर्यावसन मारामारीत झाले यामधे एक जण जखमी झाला या घटनेमुळे शिरोली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की सोशल मिडियावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण आणि छ. संभाजी महाराजांची बदनामी करणारी पोस्ट शिरोली परिसरात व्हायरल झाली. यामध्ये पोस्ट टाकणाऱ्याचे नाव निष्पन्न झाल्याने हिंदुत्ववादी कार्यकत्यांनी शिरोली फाटा येथे जाऊन अमित कलावंत याला जाब विचारला. यातून वाद निर्माण झाला. यावेळी या पोस्टचे समर्थन केल्याने वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये मुज्जमील पटेल हा जखमी झाला. यामुळे शिरोली फाटा परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले. शिरोली एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. जखमी पटेल यास पोलीसानी उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
शिरोलीतील आक्षेपार्ह मजकुर आणि तणावाचे वातावरण झाल्याचे समजताच जनसुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे , हिंदू एकता आंदोलनचे अध्यक्ष दिपक देसाई भाजप करवीर तालुका अध्यक्ष कुंदन पाटील शिरोली भाजपचे सतिश पाटील शिवप्रतिष्ठानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव. अर्जून चौगुले, या हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यानी पोलीस ठाण्यात येऊन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करताना वारंवार अशा वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून टिपू सुलतानच्या प्रतिमेची जिल्हयात गाढववरून धिंड काढण्यात येईल असा इशारा दिला
पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन्ही समाजातील लोक जमा झाल्याने वातावरण तंग बनले होते. करवीर विभागीय उप अधिक्षक क्षीरसागर यांनी शिरोली पोलीस ठाण्याला भेट देऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सुनिल गायकवाड यांच्या मार्गादर्शनाखाली फौजदार प्रमोद चव्हाण यांचे मार्फत रात्री उशीरा पर्यंत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीसानी श्रीकांत कदम, राकेश घालवाडे, निलेश शिंदे यांचेवर मारहाणीबाबत गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या गटातील अमित कलावंत मुज्जमील पटेल, शफीक फकीर यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
