शिरोलीत विद्युत पंपांचे साहित्य चोरीचे प्रकार वाढले
शिरोली : शिरोली पुलाची येथील पंचगंगा नदी काठावर असणाऱ्या शिरोली विकास संस्थेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विद्युत पंपाच्या मोटरचे स्ट्रक्चर बॉक्स फोडून चोरट्याने आतील तांब्याच्या पट्ट्या मेन स्विच असे तांब्याचे सुमारे 30 हजार रुपयाचे साहित्य लंपास केले. सात ते आठ महिन्यात या पाणी पुरवठा संस्थांच्या तिसऱ्यांदा चोरट्याने चोरी करून पोलिसांना आव्हान निर्माण केले आहे. प्रत्येक वेळी संस्थेच्यावतीने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून यातील एका चोरीचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले नसल्याचे चेअरमन सतीश पाटील यांनी सांगीतले.
यापूर्वी एक लाख रुपये किमतीचे तांब्याची इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यानी लंपास केले आहे. पण वर्षभरात या चोरट्यांचा कोणताही सुगावा आत्तापर्यंत पोलिसांना लागलेला नाही. तसेच चोरट्याने पंचगंगा नदीतील गुंडा म्हमुलाल संनदे यांचे पाच एच.पी. सबमर्सिबल पाण्यातील मोटर काढून चोरून नेले आहे. काही दिवसापूर्वी तेथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीची ट्रांसफार्मर फोडून एक लाख रुपये किमतीचे तांब्याचे वायर चोरून नेले आहेत. तसेच पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेचीही केबल व इतर इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले आहे.
वारंवार होणाऱ्या या चोऱ्यामुळे पाणी पुरवठा संस्था व शेतकरी हवालदिल झाले असून अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यातच या चोरट्यांचा हैदोस त्यामुळे नदीवर पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांचे मोटर पावसामुळे बंद आहेत. अजून किती मोटर पंपांची चोऱ्या झाल्या आहेत समजू शकलेले नाही. या चोऱ्यांचा गांभिर्याने तपास झाला नसल्याने चोरटे निर्ढावले आहेत. त्यांना पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक राहीलेला नाही त्यामुळे अगदी निर्भयपणे चोरटे चोरी करून पसार होत आहेत.
आतापर्यंत झालेल्या सर्व चोरींच्या घटनांची फीर्याद शिरोली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करावा व त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
