यात्रेतील बैलगाडी शर्यतीत दोघांना मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
शिरोली : शिरोली पुलाची गावच्या यात्रा आणि उरुसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्यावेळी झालेल्या वादातून स्पर्धक बैलगाडी मालक असलेल्या दोन भावाना बेदम मारहाण करणाऱ्या चौघांवर तब्बल तीन आठवड्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. बैलगाडी मालक सुदर्शन नाना कदम, अमोल नाना कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज पाटील, शैलेंद्र पाटील, श्रीधर पाटील, गोटू कौंदाडे यांचेवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी दि. ५ मे रोजी यात्रा आणि उरुसानिमित्त शिरोलीच्या वीट भट्टी माळावर बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले होते. यामध्ये सुदर्शन आणि अमोल कदम या भावांनी आपली बैलगाडीसह भाग घेतला होता. अंतिम टप्यात शर्यतीच्या नियमावरून कदम बंधू आणि मनोज पाटील यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ग्राम पंचायत सदस्यानी मध्यस्थी करून मारामारी सोडवली. त्यानंतर कदम बंधू बैलगाडी टेंपोत भरत असताना मनोज पाटील याने सुदर्शन कदम यास लोखंडी रॉड आणि पाईपने बेदम मारहाण केली. यावेळी अडवण्यास आलेल्या अमोल कदम यालाही मारहाण केली. यावेळी मनोज याचे साथीदार शैलेश, श्रीधर, गोटू यानी कदम बंधूना शिवीगाळ करीत धरून ठेवले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुदर्शन कदम याला उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.
उपचारानंतर सुदर्शन कदम यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेल्यानंतर फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. आपल्यावर होणाऱ्या अन्याया बाबत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे वकीलांमार्फत सांगीतल्यानंतर अखेर २४ मे रोजी रात्री उशीरा मनोज पाटील, शैलेश पाटील, श्रीधर पाटील गोटू कोंदाडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास स. पो. नि. सुनिल गायकवाड यांच्या मागदर्शना खाली हवालदार शिंदे करीत आहेत.
