शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्यास धडक ; दुचाकीस्वार, पादचारी दोघेही ठार
शिरोली : पुणे बेंगळुरू महामार्गावर शिये फाटा, हाॅटेल दुर्गामाता समोर भरधाव दुचाकीने पादचाऱ्यास जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी व दुचाकीस्वार असे दोघे ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजण्यासुमार झाला.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हाॅटेल दुर्गामाता समोर कोल्हापूरहून पुणेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकल ( क्र. एम एच ०२ ई एम ०१२३ ) ने रस्ता ओलांडून दुर्गामाता हाॅटेलकडे येणाऱ्या किणी ता. हातकणंगले येथील सचिन कुमार चौगुले ( वय ४४ ) याला जोराची धडक दिली त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर मोटरसायकलस्वार सौरभ संजय साळुंखे ( वय २८ रा. नागाळा पार्क कोल्हापूर ) गाडीसोबत ३० ते ३५ फूट फरफटत गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सचिन चौगुले हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एसीआर कंपनीत कामास होता. तो शिये फाटा येथे बसमधून उतरून दुसऱ्या पाळीसाठी कामावर येत होता. त्यावेळी रस्ता ओलांडताना भरधाव मोटरसायकलची धडक बसून तो जागीच ठार झाला सचिन हा एकुलता एक व अविवाहित असून त्या पश्चात वृद्ध आई वडील व विवाहीत तीन बहिणी असा परिवार आहे.
