महिला दिनादिवशीच नागाव ग्रा. प. सदस्याच्या घरावर हल्ला
शिरोली : महिला दिनाच्या दिवशीच नागाव ता. हातकणंगलेच्या तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्ष व मुलांनी ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय महिला सदस्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्लात सदस्यासह पती, मुलास घरात घुसून जोरदार मारहाण केली. ग्रामपंचायतीने छापलेलेल्या जाहिरातीत महिला सदस्याच्या नावातील चुकीतुन ही घटना घडली. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.
नागांव ता. हातकणंगले येथील जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत या महिला सदस्याच्या नावापुढे तीच्या पती ऐवजी तिच्या मयत दिराचे नाव छापले होते. ग्रामपंचायतीच्या हलगर्जी पणामुळे नाव छापले गेले तर ही पत्रिका गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर नावात खाडाखोड करून फिरत असल्याने महिला सदस्याच्या पतीने संबंधित व्यक्तीस विचारणा केली. पण त्याने चुकून हा प्रकार घडला आहे असे सांगितले. पण व्हॅटसअप ग्रुपवर मात्र ही चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे गावात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले. या चर्चेचे रूपांतर घरात घुसून मारहाणी पर्यंत गेले.
तंटामुक्त समिती उपाध्यक्ष व ही महिला सदस्य एकमेकांच्या शेजारीच राहत असल्याने उपाध्यक्षाने आपल्या नातेवाईकांना सोबत घेवून महिला सदस्यासह पती, मुलास मारहाण केली. यात पती व मुलगा जखमी झाले आहेत. महिला दिनादिवशी महिलेचा आदर करण्याऐवजी घरात घुसून हल्ला करत महिलांसह पती, व मुलास झालेली मारहाण ही कायद्याची पायमल्ली करणारी घटना ठरली आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
