सादळे-मादळेतील चैतन्य रिसॉर्टवर इचलकरंजी परिसरातील टोळीचा धिंगाणा : १२ जणांना अटक
शिरोली : सादळे – मादळे (ता. करवीर) येथील चैतन्य रिसॉर्टवर जेवणासाठी आलेल्या इचलकरंजी परिसरातील ग्राहकांनी बिलाच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर आणखी काही जणांना घेऊन येऊन रिसॉर्टची तोडफोड केली तसेच तेथील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत उचलून नेऊन ठार मारण्याची धमकी देऊन पुन्हा रिसॉर्टवर आणून सोडले. मारहाणीत जखमी झालेले कर्मचारी सुभाष दत्तात्रय माळी (वय ४१, रा. सादळे, ता. करवीर) व वैभव मारुती भोसले (वय २७, रा. मादळे, ता. करवीर) यांनी मारहाण करणाऱ्या सुमारे १८ ते २० जणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार १२ जणांना अटक करण्यात आली.
इचलकरंजी व दानोळी (ता. करवीर) येथील बारा तरुण सादळे मादळे येथील रिसॉर्टमध्ये आले होते. बिल देण्यावरून या तरुणांचा रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. या वादामध्ये किरकोळ धक्काबुक्की करून रिसॉर्टचे बिल देऊन संशयीत आरोपी निघून गेले. त्यानंतर काही वेळाने हे बाराजण आणखीन सात घेऊन पुन्हा रिसॉर्टमध्ये घुसले. यावेळी प्रत्येकाच्या हातात हत्यार होते. यामध्ये काठ्या, तलवार, आठ जणांना लोखंडी रॉड, एडका, कोयता अशा स्वरूपाची हत्यारांचा समावेश होता. त्यांनी रिसॉर्टच्या लाईट काचा, बोर्ड फोडले, जोरजोरात शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देत सुमाष माळी व वैमव भोसले यांना मारहाण केली. मारहाण करून त्यांना एका मोटारीच्या डिग्गीत घालून अंकली येथे घेऊन गेले. तेथून हातकणंगले येथील तारदाळ फाटा येथे जखमींना डिग्गीतून बाहेर काढत मोटारीच्या पाठीमागील सीटवर बसवले व पुन्हा कासारवाडी फाटा येथे आणून सोडले. येथे सोडत असताना त्यांनी जखमींना पोलिसात माहिती दिल्यास तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. तसेच रिसॉर्टही शिल्लक राहणार नाही अशी धमकी देऊन ते निघून गेले.
मारहाण करणाऱ्या सुमारे १८ ते २० जणांच्या जमावाने रिसॉर्टचेही मोठी तोडफोड केली. यामध्ये रिसॉर्टचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मारहाण करण्यासाठी काठ्या, लोखंडी रॉड, कोयता, तलवार व एडक्याचा वापर करण्यात आला. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा झाली आहे. मंगळवारी ८ रोजी रात्री ते बुधवारी ९ रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत हा थरार सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय गडकरी, गोटया, पटेल अशा वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
त्यानंतर. शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या सहकार्याने सचिन सदाशिव गोंधळी यांनी त्यांना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सुमारे चौदा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होते.
त्यापैकी दत्तात्रय मारुती गडकरी (वय ४८, रा. शहापूर, इचलकरंजी), रमेश शिवगण पटेल (४२), सदाशिव किसन कोरवी (४९), हरीश रामचंद्र नाईक(३७, तिघे रा. यड्राव), अनिल बाबुराव पाटील (४४), रहात लालमहम्मद मुजावर (२६), निळकंठ आप्पासो कोळी (वय ५०, तिघे रा. आसरानगर, इचलकरंजी), सुभाष पोपट काळे (३१, रा. तारदाळ), सिकंदर हुसेनसाब गड्ढेकर (४५, रा. खोतवाडी), पवन अनिल रणदिवे (२६, रा. पुलाची शिरोली), महेश बजरंग दळवी (४१), सत्यजित वसंत मोकाशी (वय ४५, दोघे रा. दानोळी). या १२ जणांना शिरोली पोलिसांनी अटक केली
त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जखमी कर्मचाऱ्यांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व उपनिरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
